AusvsInd : दिवसाअखेर पारडे पुन्हा कांगारुकडे झुकलं; स्मिथ-लाबुशेन डोकेदुखी वाढवणार?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

चौथ्या दिवशी ही जोडी धावसंख्येत किती भर घालणार यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. ही जोडी लवकर फोडून कमी टार्गेट मिळेल यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. 

Aus vs Ind 3rd Test : भारतीय संघाचा डाव आटोपून तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. सिराज आणि अश्विनने सुरुवातीला कांगारुंना दोन मोठे धक्के दिले. मात्र त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ या जोडीन संघाचा डाव सावरला. या दोघांनी 68 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 2 बाद 103 पर्यंत पोहचवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा लाबुशेन 47 (69) तर स्टीव्ह स्मिथ 29 (63) धावांवर खेळत होते. पहिल्या डावातील 94 धावांची आघाडीसह आता ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची आघाडी झाली आहे. यात चौथ्या दिवशी ही जोडी किती भर घालणार यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. ही जोडी लवकर फोडून कमी टार्गेट मिळेल यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. 

भारतीय संघाचा पहिला डाव 244 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. मोहम्मद सिराजने सलामीवीर आणि कसोटी पदार्पणात अर्धशतकी खेळी करणाऱ्या विल पुलोवस्कीला बाद करत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. संघाच्या धावफलकावर 16 धावा असताना पुलोवस्कीने विकेट गमावली. त्याने 10 धावा केल्या. अनुभवी फिरकीपटू अश्विनने डेविड वॉर्नरला पायचित करत ऑस्ट्रेलियाला दुसरा मोठा धक्का दिला. वॉर्नर अवघ्या 13 धावा करुन माघारी फिरला. 

अश्विनविरुद्ध केलेल्या स्ट्रॅटर्जीचा फायदा झाला - स्टीव्ह स्मिथ

तत्पूर्वी भारतीय संघाने 2 बाद 96 धावांवर तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रुपात कांगारुच्या संघाने टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. तो 22 धावा करुन माघारी फिरला. त्याने यासाठी 70 चेंडू खेळले. कमिन्सने अजिंक्यची विकेट घेतली. हेजलवूडने धावबादच्या रुपात हनुमा विहारीला बाद केले. त्याने 38 चेंडूत संघाच्या धावसंख्येत केवळ 4 धावांची भर घातली. त्यानंतर ऋषभ पंतने पुन्हा एक संधी दवडली. 67 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 36 धावा करणाऱ्या पंतला हेजलवूडने तंबूचा रस्ता दाखवला.

दुसऱ्या बाजूला नांगर टाकून उभा असलेल्या पुजाराचा संयम तोडण्यात कमिन्सला यश मिळाले. उसळत्या चेंडूवर ग्लोव्जला चेंडू लागून त्याने यष्टीमागे झेल दिला. 176 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने त्याने 50 धावा केल्या. धावफलकावर 206 धावा असताना अश्विनच्या रुपात भारतीय संघाला 7 वा धक्का बसला. 10 धावांची भर घालून धावबाद झाला. स्टार्कने सैनीच्या रुपात टीम इंडियाला 8 वा धक्का दिला आहे. बुमराह खातेही न खोलता रन आउट झाला. कमिन्सने मोहम्मद सिराजला 6 धावांवर बाद करत भारतीय संघाचा डाव 244 धावांतच आटोपला. रविंद्र जडेजा 28 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने 94 धावांची आघाडी घेतली. 
 


​ ​

संबंधित बातम्या