Aus vs Ind 4th Test : शुभ दिन! गिल, पंत-पुजाराच्या जोरावर टीम इंडियाने ब्रिस्बेमध्ये उधळला गुलाल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

अखेरच्या षटकात टी-20 स्टाइल फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Aus vs Ind 4th Test : ब्रिस्बेनच्या निर्णायक कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद करत मालिका 2-1 अशी जिंकली. पहिल्या डावातील आघाडीनंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने भारतासमोर 328 धावांचे आव्हान ठेवले होते. रोहित शर्मा अवघ्या 7 धावा करुन परतल्यानंतर पुजारा- शुभमन गिल या जोडीने संघाचा डाव सावरला. या जोडीनं 114 धावांची उपयुक्त भागीदारी केली. शुभमन गिलने 91 धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर पुजाराने अर्धशतकी खेळी केली. पंतने अखेरच्या षटकात टी-20 स्टाइल फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

ब्रिस्बेनच्या मैदानात रंगलेल्या  चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील फायनल दिवस निकाली लावण्याच्या इराद्याने रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीनं पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. अखेरच्या दिवशी टीम इंडियाला 324 धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने टिम इंडियाची सलामी जोडी फोडत भारताला मोठा धक्का दिला. रोहित शर्मा 21 चेंडूत 7 धावा करुन माघारी फिरला आहे. त्यानंतर युवा शुभमन गिलनं पुजाराच्या साथीनं डाव सावरला. 

 'गिल है की मानता नहीं'; सेहवागनं केली 'दिल जितनेवाली बात'!

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची खेळी केली. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या शुभमन गिलला शतकी कसोटी सामना खेळणाऱ्या लायनने बाद केले. शुभमन गिलने 91(146) धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे 22 चेंडूत 24 धावा करुन माघारी फिरला.  पुजाराच्या रुपात भारताला चौथा धक्का बसला.   त्यानंतर पंतने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने अर्धशतक पूर्ण केले. मयांक अगरवाल, वाशिंग्टन बाद झाल्यानंतर पंतने शार्दुलच्या साथीनं संघाला विजय मिळवून दिला. भारताचा हा ऐतिहासिक मालिका विजय आहे. 


​ ​

संबंधित बातम्या