Aus vs Ind 4th Test Day 3 : वॉर्नर-हॅरिस नाबाद परतले; ऑस्ट्रेलियाकडे 54 धावांची आघाडी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 17 January 2021

मंयाक अग्रवाल पुन्हा अपयशी ठरला. हेजलवूडने त्याला बाद केले. मयांकने 75 चेंडूचा सामना करत 38 धावा केल्या. ति

Aus vs Ind 4th Test Day 3 : ब्रिस्बेनच्या मैदानात सुरु असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 336 धावांत आटोपला. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांच्या अर्धशतकामुळे भारतीय संघाने 336 धावांपर्यंत मजल मारली असून ऑस्ट्रेलियाला 33 धावांची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. 

त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस जोडीनं ऑस्ट्रेलियन संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने बिन बाद 21 धावा केल्या होत्या. वॉर्नर 20 (22)* आणि  मार्कस हॅरिस 1(14) धावांवर नाबाद खेळत होते. पहिल्या डावातील 33 धावांची अल्प आघाडी आणि दुसऱ्या डावातील 21 धावांसह आता ऑस्ट्रेलिया 54 धावांची आघाडी घेतली आहे.   

तत्पूर्वी हेजलवूडच्या माऱ्याने भारतीय संघाला अडचणीत आणले होते. 2 बाद 62 धावांवर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पुजाराने तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. धावफलकावर 105 धावा असताना हेजलवूडने पुजाराच्या खेळीला ब्रेक लावला. त्याने 94 चेंडूत 25 धावा केल्या. स्टार्कने रहाणेलाही माघारी धाडण्यात यश मिळवले. त्याने 93 चेंडूत 37 धावांची खेळी केली.

मंयाक अग्रवाल पुन्हा अपयशी ठरला. हेजलवूडने त्याला बाद केले. मयांकने 75 चेंडूचा सामना करत 38 धावा केल्या. तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात धमाकेदार खेळी करणाऱ्या पंतला हेजलवूडने 23 धावांवर माघारी धाडले आहे. 6 बाद 168 धावा असताना वॉश्गिंटन आणि शार्दुल ठाकूर यांच्या खांद्यावर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी येऊन पडली.  या दोघांनी ती लिलया पेलून दाखवली. दोघांनी शतकी भागीदारी करत डाव सावरला. सातव्या विकेटसाठी त्यांनी 123 धावांची भागीदारी केली. पेट कमिन्सन शार्दूलच्या रुपात टीम इंडियाला सातवा धक्का दिला. तंबूत परतण्यापूर्वी त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशत झळकावले. 115 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने त्याने 67 धावा केल्या.  

नवदीप सैनीच्या रुपात हेजलवूडने आठवा धक्का दिला. वॉशिंग्टनची सुंदर खेळी स्टार्कने थांबवली. त्याने 144 चेंडूत 62 धावा केल्या. यात 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मोहम्मद सिराजला 13 धावांवर बाद करत हेजलवूडने भारताचा पहिला डाव संपुष्टात आणला. पहिल्या डावात टीम इंडियाने 336 धावा केल्या असून ऑस्ट्रेलियाला 36 धावांची आघाडी मिळाली आहे.


​ ​

संबंधित बातम्या