AusvsInd : सिडनीच्या मैदानात आतापर्यंत कोण ठरलंय भारी; जाणून घ्या रेकॉर्ड

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

भारतीय संघात दोन बदल करण्यात आले असून मयांकऐवजी रोहित शर्मा शुभमन गिलसोबत भारताच्या डावाला सुरुवात करेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची ताकदही वाढली आहे.

AusvsInd Head to Head Record : सिडनीच्या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत सीरिजमध्ये सहजा-सहजी हार परत्करणार नाही एवढेच नाही तर जिंकण्याची क्षमता असल्याचे संकेत दिले. मात्र सिडनीच्या मैदानाचा इतिहास हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकणारा आहे. आतापर्यंत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात SCG मैदानावर आतापर्यंत 12 सामने खेळवण्यात आले आहेत. यात भारतीय संघाला एकमेव विजय मिळाला असून ऑस्ट्रेलियाने 5 सामने जिंकले आहेत. उर्वरित सहा सामने अनिर्णित राहिले आहेत.  

भारतीय संघात दोन बदल करण्यात आले असून मयांकऐवजी रोहित शर्मा शुभमन गिलसोबत भारताच्या डावाला सुरुवात करेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची ताकदही वाढली आहे. वॉर्नर आणि विल पुकोव्स्कीच्या पुनरागमनाने ढेपाळलेल्या कांगारूंच्या जीवात जीव निश्चितच आला असेल. ही जोडीच ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकते.  

 ''बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाला विजयाची मोठी संधी''

सिडनीत सचिन-लक्ष्मण भारताचे टॉपर

भारतीय संघाने आतापर्यंत सिडनीत खेळलेल्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम हा विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने सिडनीच्या मैदानात खेळलेल्या 5 कसोटी सामन्यात 785 धावा केल्या आहेत. यात 3 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्यापाठोपाठ व्ही. व्ही. एस लक्ष्मणचा नंबर लागतो. 4 कसोटी सामन्यात 549 धावा असून त्याने 3 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने एका शकतकासह 3 कसोटी सामन्यात मिळून 147 धावा केल्या आहेत. 

AUSvsIND Pink Test : मास्टर ब्लास्टर सचिनकडून मॅकग्रा फाउंडेशनला खास गिफ्ट

ऑस्ट्रेलियाकडून पॉटिंगने खेळल्यात सर्वाधिक सामने 

ऑस्ट्रेलियाकडून सिडनीच्या मैदानात यशस्वी कामगिरी करणाऱ्या फलंदाजांमध्ये रिकी पॉटिंग, वॅली हेमंड आणि डेविड वॉर्नर यांचा समावेश आहे. रिकी पाँटिंगने 16 सामन्यात 1480 धावा कुटल्या आहेत. सिडनीत सर्वाधिक 6 शतके झळकावण्याचा विक्रम रिकी पाँटिंगच्या नावे आहे. तितकीच त्याने अर्धशकतकेही केली आहेत.

वॅली हेमंड यांनी 5 सामन्यात 808 धावा केल्या असून यात 4 शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. वॉर्नरने 8 सामन्यात 4 शतके आणि 3 अर्धशतकासह 732 धावा केल्या आहेत. दोन्ही संघातील टॉपला असलेल्या संघात सिडनीत केवळ वॉर्नरच खेळणार आहे, याचा ऑस्ट्रेलियाला कितपत फायदा होणार हे खेळ सुरु झाल्यानंतरच समजेल.  


​ ​

संबंधित बातम्या