चीते की चाल, बाज की नजर आणि जडेजाचा थ्रो...शंका नाही! (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

एका बाजूने गडी मैदान सोडून जात असताना स्मिथने दुसऱ्या बाजूने तग धरुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जडेजाने त्याचा डाव उधळला.

सिडनी कसोटीतील दुसरा दिवस भारतीय संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजा, स्मिथ आणि शुभमन गिलने गाजवला. स्मिथने दोन कसोटी सामन्यातील धावांचा दुष्काळ संपवत शतकी खेळी केली. दुसरीकडे जडेजाने आपल्या फिरकीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अक्षरश: नाचवले. त्याने लाबुशेन (91), मॅथ्यू वेड (13), कमिन्स (0) आणि लायनला (0) बाद करुन सर्वाधिक विकेट मिळवल्या. फिल्डिंगचा अद्भूत नमुना दाखवून देत स्मिथचीही विकेट त्यानेच घेतली.  परिणामी पहिल्या दिवशी 2 बाद 166 धावा करणाऱ्या कांगारुंचा पहिला डाव 338 धावांत आटोपला. 

दुसऱ्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणेनं रविंद्र जडेजाकडे चेंडू सोपवला आणि त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर पारडे भारताच्या बाजूनं वळवले. शतकाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या लाबुशेनच्या रुपात त्याने पहिली विकेट घेतली. एवढेच नाही तर शतकी खेळी करणाऱ्या स्मिथचा खेळ खल्लास करण्याच कामही त्यानेच केले.

जेव्हा लाबुशेन सामना सुरु असताना हिटमॅनला विचारतो क्वारंटाईनमध्ये काय केलंस? (VIDEO)

स्मिथची विकेट त्याला गोलंदाजीत मिळाली नसली तरी त्याने थेट यष्टिचा वेध घेऊन स्मिथला दाखवलेला तंबूचा रस्ता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवत बुलेट थ्रोने स्टीव्ह स्मिथला रन आउट केले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने केलेला थ्रोचे क्रिकेट चाहते कौतुकही करत आहेत. एका नेटकऱ्याने "चीते की चाल, बाज की नजर आणि जडेजाचा थ्रो.. संदेह नहीं करते. हा 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटातील डायलॉग मारला आहे. 

एका बाजूने गडी मैदान सोडून जात असताना स्मिथने दुसऱ्या बाजूने तग धरुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 131 धावांची खेळी केली. 105.4 षटकातील जसप्रित बुमराहच्या चेंडूवर स्मिथ दोन धावा घेण्यासाठी धावला. पण चेंडू जडेजाच्या हातात गेला आणि जडेजाने चपळता दाखवत स्मिथला तंबूत जायला भाग पाडले.  
क्षेत्ररक्षणातील अप्रतिम कामगिरीशिवाय गोलंदाजीतही जडेजाने कमालीचा खेळ दाखवला. त्याने 18 षटकात 62 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेन आणि स्मिथ वगळता विल पुकोविस्कीनं 62 धावांचे योगदान दिले.


​ ​

संबंधित बातम्या