Aus vs Ind 3rd Test Draw : हनुमा-अश्विननं कांगारुंना रडवलं!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

संयमी खेळी करणारा पुजारा मैदानात असल्यामुळे पंतला बढती देण्याचा मोठा निर्णय टीम इंडियाने घेतल्याचे पाहायला मिळाले. हनुमा विहारीच्या अगोदर त्याला पाठवण्यात आले.

Aus vs Ind 3rd Test  SCGround Sydney : सिडनी कसोटी सामन्यात अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर भारतीय अष्टपैलू हनुमा विहारी आणि फिरकीपटू आर अश्विनने दाखवलेल्या चिवट खेळीसमोर कांगारु संघाचे गोलंदाज हतबल ठरले. विकेट पडत नसल्यामुळे कांगारुंना स्लेजिंगचा डर्टी डाव खेळल्याचे पाहायला मिळाले. मात्र हनुमा विहारी आणि अश्विनने विकेटमागून होणाऱ्या बडबडीकडे दुर्लक्ष करुन आपला खेळ सुरुच ठेवला. या दोघांनी सामना अनिर्णित करण्याच्या उद्देशानेच खेली पुढे सरकवत नेली. आणि यात यश ही मिळवले. या दोघांनी सहाव्या विकेटासाठी 258 चेंडूत 62  धावांची भागीदारी केली. 

हनुमा विहारीच्या 161 चेंडूतील नाबाद 23 धावा आणि अश्विनच्या 128 चेंडूतील 39 धावांच्या जोरावर पाचव्या दिवसाअखेर भारताने 5 बाद 334 धावांपर्यंत मजल मारली. तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यासाठी ही खेळी महत्त्वपूर्ण ठरली. हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे दोन्ही संघांची मालिकेतील 1-1 बरोबरी कायम राहिली असून चौथा आणि अखेरच्या सामन्यावर मालिका कोण जिंकणार याचा फैसला अवलंबून असणार आहे. 

सिडनी कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवसाच्या  सुरुवातीलाच लायनने कर्णधार अजिंक्य रहाणेची विकेट घेतली. अजिंक्य रहाणे अखेरच्या दिवशी केवळ चार चेंडू आगाऊ खेळला. धावसंख्येत कोणतीही भर न घालता तो 18 चेंडूत 4 धावांवरच तो तंबूत परतला. वेडने अजिंक्यचा झेल टिपला. त्यानंतर पंतने त्याची जागा घेतली. संयमी खेळी करणारा पुजारा मैदानात असल्यामुळे पंतला बढती देण्याचा मोठा निर्णय टीम इंडियाने घेतला होता. पंतने संघाचा विश्वास सार्थ करणारी खेळी केली. 

पंत 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार; तिसरे टेस्ट शतक 3 धावांनी हुकलं   

सुरुवातीला 30-35 चेंडूत 5 धावा करणाऱ्या पंतने  ड्रिंक ब्रेकनंतर अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने केवळ 64 चेंडू खेळले. त्याच्यापाठोपाठ पुजाराने अर्धशतकाला गवसणी घातली. दुसऱ्या बाजूला आक्रमक फलंदाजी करणारा पंत शतकी खेळीच्या उंबरठ्यावर असताना बाद झाला. लायनने त्याला झेलबाद केले. त्याने 118 चेंडूत 97 धावांची खेळी केली.  हेजलवूडने पुजाराच्या रुपात संघाला आणखी एक धक्का दिला. पुजाराने 205 चेंडूत 77 धावांची खेळी केली. यात 12 चौकारांचा समावेश होता. पुजारा बाद झाल्यानंतर भारतीय संघ संकटात सापडेल असे वाटत होते. मात्र हनुमा विहारी आणि आर अश्विनने चिवट खेळ करत संघाचा पराभव टाळण्यात मोलाचा वाटा उचलला.  


​ ​

संबंधित बातम्या