AusvsInd : प्रमोशन मिळालेल्या पंतचा अर्धशतकी तडका!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

2018 मध्ये सिडनीच्या मैदानात पंतने नाबाद 159 धावांची खेळी केली होती. याच सामन्यात चेतेश्वर पुजाराने 193 धावा केल्या होत्या. 

AusvsInd : मागील काही सामन्यांपासून मैदानात उतरल्यानंतर 30-40 च्या घरात डगमगणाऱ्या ऋषभ पंतने मिळालेल्या बढतीचा आणि संघाच्या गेम प्लॅन यशस्वी करुन दाखवला. हनुमा विहारीच्या जाग्यावर बढती मिळालेल्या पंतने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी करुन संघाच्या आशा पल्लवती केल्या. सुरुवातीला संयमी पुजारासोबत त्याने संयम दाखवला. मात्र त्यानंतर त्याने आपला नैसर्गिक खेळ दाखवत कांगारुंच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने 64 चेंडूत अर्धशतक झळकावले. यात 5 चौकार आणि  3 उत्तुंग षटकाराचाही समावेश होता. त्याने पुजारासोबत अर्धशतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरण्याचा महत्त्वपूर्ण आणि यशस्वी प्रयत्न केला. 

2018 मध्ये सिडनीच्या मैदानात पंतने नाबाद 159 धावांची खेळी केली होती. याच सामन्यात चेतेश्वर पुजाराने 193 धावा केल्या होत्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 7 बाद 622 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते. विशेष म्हणजे विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिका 2-1 अशी जिंकली होती. पंत खेळीमुळे पुन्हा एकदा या आठवणीला उजाळा मिळत आहे.

तो आपल्या खेळीत आणखी किती धावांची भर घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कर्णधार अजिंक्य रहाणे लवकर बाद झाल्यानंतर बॅटिंग ऑर्डरनुसार, हनुमा विहारीचा नंबर येतो. मात्र भारतीय संघाने संत खेळी करण्यात माहिर असलेल्या पुजाऱ्याच्या साथीला पंतला पाठवून एक नवा गेम प्लॅन तयार केला. हा प्लॅन पंतने आपल्या खेळीनं सार्थ ठरवला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या