''शॉ ऐवजी शुभमन गिलने डावाची सुरवात केल्यास त्याच्यावर टांगती तलवार''

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 24 December 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मेलबर्नच्या मैदानावर उतरणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मेलबर्नच्या मैदानावर उतरणार आहे. भारतीय कसोटी संघ जेव्हा मैदानावर उतरेल तेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना मेलबर्न येथे येत्या शनिवारपासून खेळवला जाईल. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अनुपस्थित असणार आहेत. 

AUSvsIND : मरगळ झटकून भारतीय संघाची सरावाला सुरुवात 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीमुळे पुन्हा मायदेशी परतला आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळे मालिकेबाहेर पडला आहे. याशिवाय मागील काही सामान्यांपासून धावांसाठी झगडत असलेल्या पृथ्वी शॉमुळे भारतीय संघाला सलामीवीरची चिंता सतावत आहे. त्यामुळे येत्या सामन्यात पृथ्वी शॉ ऐवजी केएल राहुल किंवा शुभमन गिलला सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. आणि पृथ्वी शॉला  वगळल्यास या दोघांपैकी एक जण  मयांक अग्रवाल सोबत डावाची सुरवात करू शकतात. मात्र यावर आता भारतीय संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने आपले मत व्यक्त केले आहे. 

आकाश चोप्राने आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारतीय संघातील सलामीवीराच्या समस्येबाबत बोलताना, पृथ्वी शॉला दुसर्‍या सामन्यात पुन्हा एकदा खेळण्याची संधी देण्याची शक्यता फार कमी असल्याचे म्हटले आहे. तसेच सध्याच्या स्थितीला पृथ्वी शॉचा आत्मविश्वास खूप खालावलेला असून, पहिल्या कसोटी सामन्यात देखील तो अपयशी ठरला असल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे. याव्यतिरिक्त पृथ्वी शॉला पुन्हा भविष्यात संधी मिळणार नाही असे अजिबातच होणार नसून, भविष्यात तो पुन्हा संघाचा हिस्सा असणार असल्याचे आकाश चोप्राने सांगितले. 

टीम इंडियात होतोय दुजाभाव; भारताच्या माजी महान फलंदाजाचे मोठे वक्तव्य  

त्याशिवाय, केएल राहुलने संघाची सुरवात करावी असे आपले वैयक्तिक मत असल्याचे आकाश चोप्राने पुढे या व्हिडिओत सांगितले. तर केएल राहुलच्या जागी शुभमन गिल हा सलामीवीर म्हणून येण्याचा पर्याय अजिंक्य रहाणेकडे असून, मात्र शुभमन गिलने डावाची सुरवात केल्यास त्याच्यावर टांगती तलवार राहणार असल्याचे मत आकाश चोप्राने व्यक्त केले. कारण दुसऱ्या सामन्यानंतर पुन्हा रोहित शर्माची सलामीवीर म्हणून संघात एन्ट्री होणार असल्याचे आकाश चोप्राने सांगितले. मात्र शुभमन गिल व केएल राहुल दोघेही प्लेयिंग इलेव्हन मध्ये खेळणार असतील, आणि शुभमन गिल डावाची सुरवात करणार असेल तर, केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर किंवा इतर दुसऱ्याच कोणत्यातरी नंबरवर खेळावे लागणार असल्याचे आकाश चोप्राने सांगितले.                  


​ ​

संबंधित बातम्या