ब्रिस्बेनचं नाव पंत नगर करा; योगींचा फोटो शेअर करत सेहवागची नामांतरावर बॅटिंग

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 20 January 2021

पंतच्या खेळीनं सर्वांनाच प्रभावित केले आहे. मालिका विजयानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

भारतीय संघाने ब्रिस्बेनच्या मैदानात ऐतिहासिक विजय नोंदवून मालिकेत 'अंजिक्य' कामगिरी नोंदवली. यष्टिमागे कॅच सोडून आणि वारंवार संधी मिळून शॉट सिलेक्शनमध्ये गोंधळणाऱ्या ऋषभ पंतने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विश्वसनीय खेळीनं त्याने आपल्या टिकाकारांना उत्तर तर दिलेच मात्र माझ्यावर भरवसा ठेवू शकता, हेही त्याने दाखवून दिले. आपला हा फॉर्म तो कधीपर्यंत कायम ठेवणार हे येणारा काळच ठरवेल. सातत्य कायम राखून त्याने यष्टिमागील जबाबदारीसर भारतीय संघातील स्थान मजबूत करावे, अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असेल. 

पंतच्या खेळीनं सर्वांनाच प्रभावित केले आहे. मालिका विजयानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. गिल है की मानता नहीं, या खास शब्दांत शुभमन गिलच्या खेळाला दाद देणाऱ्या सेहवागने पंतच्या खेळीला आपल्या खास शैलीत आनंद व्यक्त केलाय. त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोवर आजपासून ब्रिस्बेनचे नाव पंतनगर असे लिहिलेले दिसते. नव्या दमाच्या गड्यांनी भारतीय संघाच्या ऐतिहासि विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयाचा आनंद वर्षांनुवर्षे कायम राहिल, अशा आशयाच्या ओळींसह त्याने योगी आदित्यनाथ यांचा फोटो शेअर केलाय. त्याचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात झालेल्या सामन्यात भारतीय संघाला 328 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतीय संघाने हा सामना अनिर्णित केला तरी खूप मोठी गोष्ट ठरेल, असे अनेक जाणकारांचे मत होते. मात्र शुभमन गिलची 91 धावांची खेळी, पुजाराचे संयमी अर्धशत आणि पंतची आश्वासक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यासह मालिका 2-1 अशी खिशात घातली. पहिल्या डावात 23 धावांवर अडखळलेल्या ऋषभ पंतने 89 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात त्याने धोनीचा विक्रमही मागे टाकला. 1000 धावांचा टप्पा सर्वात कमी डावात करणारा तो भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ठरला. 


​ ​

संबंधित बातम्या