भारत चीनमध्ये होणार मित्रत्वाची फुटबॉल लढत

वृत्तसंस्था
Friday, 20 July 2018

भारतीय फुटबॉल संघ या वर्षी शेजारील देश चीनबरोबर आंतरराष्ट्रीय मित्रत्वाची लढत खेळणार असल्याचे भारतीय फुटबॉल महासंघाने शुक्रवारी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघ या वर्षी शेजारील देश चीनबरोबर आंतरराष्ट्रीय मित्रत्वाची लढत खेळणार असल्याचे भारतीय फुटबॉल महासंघाने शुक्रवारी स्पष्ट केले. 

मित्रत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय लढतीसाठी "फिफा'च्या वतीने ठेवण्यात आलेल्या 8 ते 16 ऑक्‍टोबर या कालावधीत ही लढत होणार आहे. भारताने या लढतीसाठी 13 ऑक्‍टोबर ही तारीख सुचवली आहे. अर्थात, "फिफा'ची कार्यक्रम समिती तारीख निश्‍चित करणार आहे. भारत सध्या "फिफा' क्रमवारीत 97, तर चीन 75व्या स्थानावर आहे. 

भारत आणि चीन देश सध्या फुटबॉलमध्ये झपाट्याने प्रगती करत असून, फुटबॉल तज्ज्ञांचे या दोन्ही देशांकडे बारीक लक्ष आहे. या संदर्भात चीनबरोबर सुरू असलेल्या चर्चेला फळ आले, असे मत भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी सांगितले. 
या लढतीमुळे भारताला पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या "एएफसी' आशियाई करंडक स्पर्धेसाठी चांगला सराव मिळेल, असेही महासंघाने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत चीनचेच वर्चस्व                                                                                               भारत आणि चीन यांच्यात आतापर्यंत 17 लढती झाल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व लढती भारतात झाल्या होत्या. मात्र, यात वर्चस्व चीनचे राहिले. चीनने 12 विजय मिळविले आहे, तर पाच लढती बरोबरीत सुटल्या आहेत. पण, आता परिस्थिती बदलली आहे. भारतीय संघ जून 2016 ते नोव्हेंबर 2017 या कालवधीत खेळलेल्या 12 सामन्यात अपराजित आहे. चीनविरुद्धच्या लढतीच फरक इतकाच की भारतीय संघ प्रथमच चीनमध्ये खेळणार आहे.

एएफसी करंडक स्पर्धेच्या तयारीसाठी चीनमध्ये खेळायला मिळण्यासारखी दुसरी चांगली संधी नाही. आपले खेळाडू या संधीचा चांगला फायदा उठवतील. आम्ही या कसोटीसाठी सज्ज आहोत. 
स्टिफन कॉन्स्टटाईन, भारतीय फुटबॉल प्रशिक्षक


​ ​

संबंधित बातम्या