Schoolympics 2019 : सकाळ 'स्कूलिंपिक्‍स' स्पर्धेला उत्साहात सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 November 2019

शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्तेला गेली चार वर्षे हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या सकाळ "स्कूलिंपिक्‍स'च्या पाचव्या मोसमाचे सोमवारी लॉ कॉलेज मैदानावर उत्साहाच्या वातावरणात सुरवात झाली.

पुणे : शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्तेला गेली चार वर्षे हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या सकाळ "स्कूलिंपिक्‍स'च्या पाचव्या मोसमाचे सोमवारी लॉ कॉलेज मैदानावर उत्साहाच्या वातावरणात सुरवात झाली. या वेळी स्पर्धेच्या प्रायोजकांच्या हस्ते मैदान पूजन करण्यात आले आणि विविध रंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. 

स्पर्धेच्या पाचव्या मोसमात चारशेहून अधिक शाळांनी सहभाग घेतला असून, विविध 22 क्रीडा प्रकारात शालेय विद्यार्थी आपले क्रीडा कौशल्य पणाला लावणार आहेत. क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस आणि बॉक्‍सिंग क्रीडा प्रकारांनी आज या स्पर्धेला सुरवात झाली. स्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन विधी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. मैदान पूजन झाल्यावर महेश विद्यालय आणि एचडीएफसी प्रशाला संघांतील सामना पाहुण्यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. 

या वेळी मुख्य प्रायोजक मॅप्रो फूड्‌सच्या राधिका व्होरा यांच्यासह चितळे डेअरीचे निखिल चितळे, गिरीश चितळे, सूर्यदत्तचे संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, श्री वेंकटेश बिल्डकॉनचे अंकुश आसबे, एमजेएम हॉस्पिटलचे मनिष बोरसे, लोकमान्य मल्टिपर्पझ को.ऑप. सोसायटीचे सुशील जाधव, बॅंक ऑफ बडोदाचे ब्रजेश खाले, भैरवी प्युअर व्हेजचे राहुल मुरकुटे, विवेक बिडगर असोसिएट्‌सचे विवेक बिडगर, जस्ट क्रिकेट अकादमीचे पराग मोरे, एनपीएव्हीचे श्रेया केला, सचिन हिंगणे हे सहप्रायोजक उपस्थित होते. उद्‌घाटन सोहळ्यात सकाळ माध्यम समूहाचे बिझनेस हेड (इव्हेंट) राकेश मल्होत्रा यांच्या हस्ते फुलझाड देऊन स्वागत करण्यात आले. 

उद्‌घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांनी या वेळी शालेय स्तरावर खेळाची आवड निर्माण होण्याची नितांत गरज असताना "सकाळ' माध्यम समूह "स्कूलिंपिक्‍स'च्या माध्यमातून याची सुरवात करत असल्याचे आवुर्जन सांगितले. यामुळे लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी नुसते हक्काचे व्यासपीठ नाही, तर त्यांच्यातील निर्णय क्षमता, परिस्थितीची जाणीव वाढीस तर लागणार आहेच. पण, बरोबरीने आव्हानाचा सामना करून त्यावर मात करण्याची सवय देखिल त्यांना लागणार असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.


​ ​

संबंधित बातम्या