आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे स्टुअर्ट ब्रॉडवर आयसीसीची कारवाई 

टीम ई-सकाळ
Tuesday, 11 August 2020

इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला कसोटी सामन्यादरम्यान आचारसंहिता भंग केल्याबद्दल आयसीसीने दंड ठोठावला आहे.

कोरोनाच्या काळानंतर वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेनंतर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला कसोटी सामन्यादरम्यान आचारसंहिता भंग केल्याबद्दल आयसीसीने दंड ठोठावला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याचे लक्षात आले होते. त्यानंतरच आयसीसीने त्याच्यावर कारवाई करत, सामन्याच्या मानधनातील 15% दंड ठोठावण्यात आला आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेनंतर 5 ऑगस्टपासून इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेस सुरवात झाली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला हार पत्करावी लागली. मात्र या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 8 ऑगस्ट रोजी, पाकिस्तानच्या दुसर्‍या डावाच्या वेळेस ब्रॉडने 46 व्या षटका दरम्यान यासिर शाहला बाद केले. यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने अनुचित भाषा वापरली होती. त्यामुळे आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियमातील 2.5 चे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मैदानातील पंच रिचर्ड केटलबरो आणि रिचर्ड आयलिंगवर्थ यांनी स्टुअर्ट ब्रॉडवर यासंदर्भातील आरोप निश्चित केले होते. या आरोपांबाबत ब्रॉडने देखील गुन्हा कबूल केला आहे. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...       

यामुळे आयसीसीने स्टुअर्ट ब्रॉडच्या या कृतीवर कारवाई केली असून, ब्रॉडला या सामन्याच्या मानधनातील 15% रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. तसेच या वागणुकीमुळे स्टुअर्ट ब्रॉडच्या खात्यावर एक डीमेरिट पॉईंट देखील जमा करण्यात आला आहे. यापूर्वी, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वँडरर्स येथील चौथ्या कसोटी सामन्याच्या वेळेस आणि ट्रेंट ब्रिजच्या भारत विरुद्धच्या तिसर्‍या कसोटी दरम्यान स्टुअर्ट ब्रॉडने अशाच प्रकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले होते. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर, सलामीवीर शान मसूदच्या शतकी खेळी आणि बाबर आझमच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 326 धावा जमवल्या होत्या. तर 326 धावांची बरोबरी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाचा पहिला डाव 219 धावांवरच आटोपला. यानंतर पहिल्याच डावात आघाडी मिळवलेल्या पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना फक्त 169 धावाच उभारल्या. त्यामुळे 277 धावांचे लक्ष गाठण्यासाठी इंग्लंडला 7 गडी गमवावे लागले. पाकिस्तानने दिलेल्या 277 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था 5 गड्यांच्या मोबदल्यात 100 धावा अशी झाली होती. परंतु ख्रिस वॉक्स 84 आणि जोस बटलर 75 यांनी बनवलेल्या भागीदारीमुळे इंग्लंडने सामना तीन गडी राखत आपल्या खिशात घातला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1 - 0 अशी आघाडी घेतली.              


​ ​

संबंधित बातम्या