जागतिक मैदानी स्पर्धा : आम्ही उत्तम यजमान दाखविण्यासाठी कतार सज्ज

नरेश शेळके
Tuesday, 17 September 2019

विशेषतः फुटबॉल, हॅंडबॉल आणि ऍथलेटिक्‍स यात या देशाची विशेष मक्तेदारी आहे. त्यापैकी यंदा ऍथलेटिक्‍सच्या जागतिक स्पर्धेचे आणि तीन वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कप फुटबॉलचे आयोजन करून आखातातील हा चिमुकला देश आपली श्रीमंती जगापुढे तर ठेवणारच आहे, त्याचबरोबर आपण किती उत्तम यजमान आहोत, हेसुद्धा सिद्ध करून दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे.

जगातील श्रीमंत देशांपैकी एक म्हणजे कतार. केवळ हा देश पैशाच्या किंवा जीडीपीच्या दृष्टीने श्रीमंत नाही, तर खेळातही त्याची श्रीमंती आहे. विशेषतः फुटबॉल, हॅंडबॉल आणि ऍथलेटिक्‍स यात या देशाची विशेष मक्तेदारी आहे. त्यापैकी यंदा ऍथलेटिक्‍सच्या जागतिक स्पर्धेचे आणि तीन वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कप फुटबॉलचे आयोजन करून आखातातील हा चिमुकला देश आपली श्रीमंती जगापुढे तर ठेवणारच आहे, त्याचबरोबर आपण किती उत्तम यजमान आहोत, हेसुद्धा सिद्ध करून दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 27 सप्टेंबरपासून दोहा येथील खलीफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 17वी जागतिक मैदानी स्पर्धा होत आहे. मॅरेथॉन आणि चालण्याच्या स्पर्धा मात्र दोहाच्या समुद्रकिनारी असलेल्या कॉर्निश या परिसरात (मुंबईच्या मरीन ड्राइव्हसारखा भाग) होणार आहे. 

स्पर्धा कतारमध्ये होणार म्हटल्यावर यजमान देशाला किती पदके मिळणार, हा प्रश्‍न साहजिकच सर्वांपुढे आहे. यजमान म्हटल्यावर त्यांच्या ऍथलिट्‌सने जास्तीत जास्त पदके जिंकावी, अशी माफक अपेक्षा असते. मात्र, कतारच्या ऍथलिट्‌सची गेल्या काही महिन्यांतील कामगिरी विचारात घेतली तर अपेक्षाभंग होण्याचीच शक्‍यता अधिक आहे. पाच महिन्यांपूर्वी दोहा येथेच झालेल्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत कतारला दोन सुवर्णपदकांसह फक्त सहा पदके मिळविता आली. हे चित्र बरेच काही सांगून जाते. कतारच्या ऍथलेटिक्‍सचा विचार केला तर काही नावे नेहमीच स्मरणात राहतात.

'कतारी बुलेट' म्हणून ओळखला जाणारा वेगवान धावपटू तलाल मन्सूर, मध्यम पल्ल्याचा धावपटू अब्दुल सुलेमान, लांब पल्ल्याचा धावपटू अहमद हसन अब्दुल्हा, उंच उडीतील विद्यमान विजेता मुताझ बारशिम, चारशे मीटर हर्डल्समधील आशियाई विजेता अब्दे रहमान सांबा ही नावे लगेच डोळ्यांपुढे येतात. यापैकी मुताझ आणि सांबा यांच्यावर कतारच्या बऱ्याच आशा आहेत. मात्र, गेल्या महिन्यात हे दोघे फारशी काही चमक दाखवू शकले नाही.

कतारने जागतिक स्पर्धेत आतापर्यंत जी काही पदके जिंकली आहेत, ती आफ्रिकन देशातून (विशेषतः केनिया व सुदान) आयात केलेल्या खेळाडूंच्या जोरावर. कतारने पहिले सुवर्णपदक व पहिले पदक 2003च्या पॅरिस स्पर्धेत जिंकले. जन्माने केनियन असलेल्या सैफ शाहिनने तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत हे सुवर्णपदक जिंकले होते. दोन वर्षांनंतर गोठनबर्ग येथे त्याने ते सुवर्ण कायम ठेवले. आतापर्यंतच्या सात पदकांत दोन वर्षांपूर्वी उंच उडीत सुवर्णपदक जिंकणारा मुताझ बारशिम हा एकमेव जन्माने कतारी आहे. त्याच्या नावावर 2.43 मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी आहे.

मात्र, यंदाच्या मोसमात फक्त तीन स्पर्धांत भाग घेणाऱ्या मुताझच्या नावावर 2.27 मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी आहे. तीच गत चारशे मीटर हर्डल्समध्ये सांबाची आहे. आठशे मीटरचा विद्यमान आशियाई विजेता अब्दुला अबू बकर हासुद्धा फार्मात नाही. महिलांच्या बाबतीत कतारची पाटी कोरीच आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेचे ओपनिंग तर ग्रॅंड होणार आहे; मात्र पदकतालिकेत ऍथलिट्‌स कतारचे ग्रॅंड ओपनिंग करतील का, हा लाख मोलाचा प्रश्‍न आहे. 


​ ​

संबंधित बातम्या