कशी होणार आयपीएल ? `या` मुद्यांवर मिळणार स्पष्टता

शैलेश नागवेकर
Saturday, 1 August 2020

मुहूर्त आणि मंगल कार्यालय अगोदरच जाहीर करून टाकल्यानंतर लग्नाची बोलणी यशावकाश करावी असा प्रकार आयपीएलच्या आयोजनात घडत आहे.

नवी दिल्ली : मुहूर्त आणि मंगल कार्यालय अगोदरच जाहीर करून टाकल्यानंतर लग्नाची बोलणी यशावकाश करावी असा प्रकार आयपीएलच्या आयोजनात घडत आहे. आयपीएल प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी अमिरातीत होणाऱ्या आयपीएलची तारीख अगोदरच घोषित केल्यानंतर उद्या रविवारी समितीची बैठक होणार आहे. अनेक महत्वाच्या मुद्यांवर स्पष्टता मिळावी यासाठी सर्व फ्रॅंचाईझीही डोळे लावून बसले आहेत. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत अमिरातीत आयपीएल होईल असे जाहीर करण्यात आल्यानंतर पडद्यामागून सर्व हालचाली सुरू झाल्या. पण कोरोनाच्या विळख्यात हे शिवधनुष्य पेलण्यासाठी पावलो पावली सुरक्षा घ्यावी लागणार आहे. प्रमाणित कार्यप्रणाली, वेळापत्रक, परदेशी खेळाडूंची उपलबद्धता, संघांचा प्रवास आणि खेळाडूंबरोबर कुटूंबाला परवानगी असे अनेक प्रश्‍नांवर प्रशासकीय समिती काय स्पष्टता देते यावर फ्रॅंचाईझी लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे केवळ भारकीय क्रिकेटपटूच नव्हे तर आयपीएलशी करारबद्ध झालेले परदेशी खेळाडू आणि त्यांची क्रिकेट मंडळही उत्सुक आहेत. 

सरकारकडून अजून हिरवा कंदील नाही 
वरवरची तयारी दिसत असली तरी कागदोपत्री परवानगी मिळणे आवश्‍यक आहे. अमिरातीत खेळण्याबाबत बीसीसीआयने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. पण सरकारने हिरवा कंदील दिल्याचे कोणीही स्पष्ट केलेले नाही. या परवानगीवरच व्हिसाची प्रक्रिया अवलंबून असणार आहे. व्हिसाचा खर्च कोणी करायचा त्याची प्रक्रिया कधीपासून सुरू करायची याबाबत उत्तराची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, असे एका फ्रॅंचाईझी प्रवत्याने सांगितले. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

दुबईतही कोरोनाचे रुग्ण आहेत या पार्श्‍वभूमीवर कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या करू नये याबाबतची नियमावली कशी असणार. हॉटेलमध्य केवळ संघच असणार की इतर पर्यटकही असणार, खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था हॉटेलमधून होणार ही बाहेरून आणले जाणार, एखादा खेळाडू जखमी झाला तर बदली खेळाडूची नियमावली कशी असणार आणि एकाच वेळी किती खेळाडूंना अमिरातीत नेता येणार असे अनेक प्रश्‍न फ्रॅंचाईझीला पडलेले आहेत. त्याची उत्तर उद्याच्या बैठकीत प्रसासकीय समितीला द्यावी लागणार आहेत 

कुटूंबाला सोबत नेता येणार? 
आयपीएलचा कालावधी 60 दिवसांचा आहे सरावासाठी अगोदर काही दिवस जावे लागणार आहे. त्यामुळे कुटूंब सोबत असण्याची मागणी खेळाडूंनी केली तर त्याबाबतची व्यवस्था कशी असेल याचे उत्तर उद्याच मिळवण्यासाठी फ्रॅंचाईझी प्रयत्न करतील. 

परदेशी खेळाडूंचा प्रश्‍न 
सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रमुख परदेशी खेळाडूंशिवाय खेळावे लागण्याची शक्‍यता आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका 15 सप्टेंबरर्यंत चालणार आहे. कॅरेबियन लीग 10 सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेत विमानसेवा बंद असल्यामुळे त्यांचे खेळाडू कसे येणार तसेच श्रीलंकेतील लीगमुळे मलिंगा आणि उदाना हे दोन खेळाडू सुरुवातीच्या काळात अनुपलब्ध असतील याप्रश्‍नावर प्रशासकीय समितीला ठोस उत्तर द्यावे लागणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या