आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेतील दोषींवर त्वरित कारवाई, आयोजकांची माफी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

- "लव्हली प्रोफेशनल विद्यापीठा'ने वाढत्या विराेधामुळे अखेर सपशेल शरणागती पत्करली

- वादग्रस्त ठरलेला जलतरणपटू साहिल चोप्रासह, स्पर्धा ठिकाणी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना हटविण्याचा निर्णय घेत "पुन्हा असे घडणार नाही', अशी माफी आयोजकांना मागावी लागली. 

पुणे - आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत यजमान या नात्याने असलेल्या अधिकार स्वातंत्र्याचा गैरवापर करून निर्णय बदलणाऱ्या जालंधरमधील आयोजक "लव्हली प्रोफेशनल विद्यापीठा'ने केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू आणि भारतीय विद्यापीठ संघटना (एआययू) यांनी गंभीर दखल घेतल्यामुळे सपशेल शरणागती पत्करली. वादग्रस्त ठरलेला जलतरणपटू साहिल चोप्रासह, स्पर्धा ठिकाणी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना हटविण्याचा निर्णय घेत "पुन्हा असे घडणार नाही', अशी माफी आयोजकांना मागावी लागली. 
आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धा जालंधर येथे सुरू आहेत. "लव्हली विद्यापीठ' या स्पर्धेचे यजमान असून, त्यांनी आपल्याच संघाच्या साहिल चौप्रा यास 50 मीटर बटरफ्लाय शर्यतीत चुकीच्या सुरवातीनंतरही विजेता म्हणून घोषित केले होते. महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रे याच्यावर अन्याय झाला होता. मात्र, असे असूनही आयोजक आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. याप्रकरणात आक्षेप घेतल्यानंतरही आयोजक आपला निर्णय बदलण्यास तयार नव्हते. सर्वच सहभागी विद्यापीठांनी या प्रकरणी बहिष्काराचे अस्त्र उगारल्यावर त्यांनी हा निर्णय बदलला. मिहिरला सुवर्णपदक देण्याची दुरुस्ती केली. मात्र, चुकीची सुरवात करूनही साहिलला अपात्र न ठरवता त्याला रौप्यपदक देण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले होते. खेळाडूंना धमकाविणे, तलावावर बॉक्‍सर आणणे असे दडपशाहीचे प्रकार आयोजकांनी केले होते. 
सोशल मीडियावरून या सगळ्या प्रकाराला वाचा फुटल्यावर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. त्यांनीदेखील या संदर्भात खेल प्राधिकरण (साई) प्रमुख संदीप प्रधान, तसेच "एआययू' यांना त्वरित लक्ष घालण्यास सांगितले होते. त्यानुसार, "एआययू'चे सह-सचिव डॉ. बालजित सिंग शेखॉन यांनी आयोजक विद्यापीठास या प्रकरणी चोविस तासांत खुलासा करण्याची, तसेच दोषी पदाधिकारी आणि खेळाडूस तातडीने हटविण्याचे आदेश दिले होते. 
या सगळ्या नाट्यानंतर आज रविवारी आयोजकांनी अखेर पुन्हा असे घडणार नाही, अशी माफी मागून स्पर्धेसाठी नियुक्त सर्व तंत्रज्ञ, पदाधिकारी यांना हटविण्याची कारवाई केली. त्याचबरोबर साहिलला सर्व प्रकारामधून बाद ठरविण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी विद्यापीठाच्या क्रीडा संचालकांनी सहभागी जलतरणपटूंची बैठक घेऊन त्यांना सहभागी होण्याची विनंती केली. 
--------------- 

सारे जागतिक स्पर्धा आणि राष्ट्रीय पारितोषिकासाठी 
यजमान विद्यापीठाने अरेरावी करणे हे विद्यापीठ स्पर्धेत आज घडलेले नाही. या वेळी फक्त ते ठळकपणे समोर आले. जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करायचे आणि पदक मिळवत वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय पारितोषिकासाठी आपले स्थान भक्कम करायचे यासाठीच हे सगळे चालते. त्याचबरोबर या वेळी जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी आपले खेळाडू बसावेत यासाठी देखील प्रयत्न केले गेले. त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंना अपयशाचे धनी व्हावे लागते, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. 
--------- 

हा प्रकार चुकीचाच होता. आपल्या खेळाडूवर अन्याय रोखण्यासाठी आम्ही शक्‍य ते प्रयत्न केले आणि त्यांना निर्णय बदलण्यास भाग पाडले. यानंतरही खेळाडूंच्या बहिष्काराचे कारण समजू शकले नाही. आम्ही खेळाडूंना केवळ जलतरण तलावावर उपस्थित राहण्यास सांगितले होते. खेळाडूच्या नावाचा पुकारा झाल्यास तो किमान उपस्थित असणे महत्त्वाचे असते. कुठल्याही खेळाडूला सहभागी व्हायचे बंधन घातले नाही. परिस्थितीनुसार निर्णय घ्या, खेळाडूंच्या काळजीला प्राधान्य द्या, असे आदेश संघ व्यवस्थापनाला दिले होते. 
- दीपक माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा संचालक 


​ ​

संबंधित बातम्या