हॉकी विश्वकरंडक : ऑस्ट्रेलिया- नेदरलॅंड्‌स लढतच विजेता ठरवणार? 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 December 2018

तीन आठवड्यांच्या दीर्घ स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीपूर्वी चार दिवसांचा ब्रेक मिळालेले चारपैकी तीन संघ उपांत्यपूर्व फेरीत गारद झाले. आता त्यातून बचावलेले गतविजेते ऑस्ट्रेलिया आणि प्रबळ दावेदार नेदरलॅंड्‌स यांच्यात होणाऱ्या उपांत्य लढतीतील विजेता संघच स्पर्धेचा विजेता ठरवेल.​

भुवनेश्‍वर : तीन आठवड्यांच्या दीर्घ स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीपूर्वी चार दिवसांचा ब्रेक मिळालेले चारपैकी तीन संघ उपांत्यपूर्व फेरीत गारद झाले. आता त्यातून बचावलेले गतविजेते ऑस्ट्रेलिया आणि प्रबळ दावेदार नेदरलॅंड्‌स यांच्यात होणाऱ्या उपांत्य लढतीतील विजेता संघच स्पर्धेचा विजेता ठरवेल. 

ऑस्ट्रेलियास विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकची संधी आहे. त्याच वेळी त्यांना कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्याचा अनुभव असलेल्या नेदरलॅंड्‌सच्या खेळाडूंची धास्ती वाटत आहे. ब्रेकऐवजी खेळत असल्यावर लय कायम राहते, हेच नेदरलॅंड्‌सने सिद्ध केले आहे. आम्हाला नेदरलॅंड्‌सची ताकद माहिती आहे. कधीही आम्ही काहीही गृहीत धरणार नाही. गतस्पर्धेतील अंतिम लढत हा इतिहास झाला आहे, असे ऑस्ट्रेलियाचे मार्गदर्शक कॉलिन बॅश यांनी सांगितले. आपल्या नवोदित संघास उपांत्य लढतीस तयार करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत गटात अव्वल आलेले भारत, जर्मनी आणि अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीत बाद झाले आहेत. इंग्लंड मार्गदर्शक डॅनी केरी यांनी अर्जेंटिनाला ब्रेकचा फटका बसल्याचे सांगितले होते, तर वासुदेवन भास्करन; तसेच "द्रोणाचार्य' पुरस्कारविजेते क्‍लेरेन्स लोबो यांनीही याचाच फटका भारतास बसल्याचे सांगितले. दीर्घ ब्रेक असल्यावर खेळाडू रिलॅक्‍स होतात. किती ट्रेनिंग करणार, हा प्रश्नच असतो, असे त्यांनी सांगितले. 
दरम्यान, इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात दुसरी उपांत्य लढत होईल. त्यात गेल्या काही लढतींत इंग्लंडने वर्चस्व राखले आहे, तरी नवीन परंपरा बेल्जियम निर्माण करीत आहेत. त्यामुळे यापूर्वीचे निकाल गृहीत धरून अंदाज बांधणे चुकीचे होईल, असे मानले जात आहे. बेल्जियम केवळ इंग्लंडचीच नव्हे; तर ऑस्ट्रेलिया किंवा नेदरलॅंड्‌सचेही समीकरण बिघडवेल, असे मानले जात आहे.  

 
 


​ ​

संबंधित बातम्या