आशियाई ऍथलेटिक्‍स : 'हिमा विरुद्ध सल्वा नासेर' हेच स्पर्धेचे आकर्षण 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 April 2019

टोकीयो ऑलिंपीकचे पडघम वाजू लागले असून भारतीय ऍथलिट्‌साठी ऑलिंपीकच्या तयारीचा एक भाग म्हणजे उद्या, रविवारपासून दोहा (कतार) येथील खलीफा स्टेडियममध्ये सुरु होत असलेली आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धा होय.

नागपूर : टोकीयो ऑलिंपीकचे पडघम वाजू लागले असून भारतीय ऍथलिट्‌साठी ऑलिंपीकच्या तयारीचा एक भाग म्हणजे उद्या, रविवारपासून दोहा (कतार) येथील खलीफा स्टेडियममध्ये सुरु होत असलेली आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धा होय. ऑलिंपीकचा पात्रता कालावधी एक मे पासून सुरु होत असल्याने आपण किती सज्ज आहो, हे तपासण्याची पहिली संधी भारतीय ऍथलिट्‌सला दोहातील स्पर्धेत मिळणार आहे. गतस्पर्धेत भारतीय ऍथलिट्‌सने 29 पदकासह अव्वल स्थान मिळविले होते. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे कडवे आव्हान भारतीयांपुढे आहे. 

पुढील सहा महिन्यात दोहा येथे आणखी दोन महत्वाच्या स्पर्धा होत आहे. पुढील महिन्यात चार तारखेला डायमंड लीग तर सप्टेंबर महिन्यात विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धा होत आहे. त्यामुळे आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धा ही एकप्रकारे विश्‍व स्पर्धेच्या आयोजनाच्यादृष्टीने तयारीचा एक भाग होय. उत्तम आयोजनासोबत पदकतालिकेत वरचे स्थान मिळवून एकप्रकारे आशियाई ऍथलेटिक्‍सवर वर्चस्व गाजविण्याच्या तयारीत कतार आहे. कारण अध्यक्षपदी कतारचे जनरल दहलान अल-हमाद यांची शनिवारी फेरनिवड झाली आहे. 

दोन वर्षापूर्वी भुवनेश्‍वर येथील स्पर्धेत भारताने 29 पदकांसह पदकतालिकेत चीनला मागे टाकून अव्वल स्थान मिळविले होते. या यशाला अनेक कांगोरे होते. कारण यजमान म्हणून आपल्याला तीन प्रवेशिका पाठविण्याची मुभा होती, तर चीन, जपानने आपला दुय्यम संघ पाठविला होता. त्यानंतर गेल्यावर्षी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय ऍथलिट्‌ने धमाकेदार कामगिरी केली. त्यामुळे दोहात भारतीय ऍथलिट्‌स जबरदस्त कामगिरी करतील, अशी आशा बाळगण्यात येत आहे. मात्र, यावेळी त्यांच्यापुढे यजमान कतारसोबत, इराण, इराक, कझाकिस्तान, बहरीनचे कडवे आव्हान आहे. चीन, जपाननेही आपला तगडा संघ उतरविला आहे. 

राष्ट्रकूल, आशियाई क्रीडा स्पर्धेतील भालाफेकपटू नीरज चोप्रा, चारशे मीटर हर्डल्समधील राष्ट्रीय विक्रमवीर ए. धारुन, लांब उडीतील युवा ऍथलिट्‌ श्रीशंकर, आठशे मीटर मधील आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मंजीत सिंग, लांब उडीची खेळाडू निना पिंटो यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. अरपिंदर सिंग (तिहेरी उडी), तेजस्वीन शंकर (उंच उडी), सुधा सिंग (स्टीपलचेस), जिस्ना मॅथ्यू यांची विविध कारणामुळे निवड होऊ शकली नाही. त्यामुळे गोळाफेकपटू ताजींदरसिंग तूर, अविनाश साबळे (स्टीपलचेस) आणि जिन्सॉन जॉन्सन (800, 1500 मीटर) यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केल्या जात आहे. ताजींदरसिंग 20.75 मीटरच्या कामगिरीसह सध्या क्रमवारीत आघाडीवर असून इतर प्रतिस्पर्ध्यांना 20 मीटरच्या वर कामगिरी करता आलेली नाही. सहा महिन्यात दोनदा राष्ट्रीय विक्रम मोडित काढणाऱ्या अविनाश साबळेपुढे सुवर्णपदकासाठी बहरीनच्या जॉन किबेट, इराणच्या हुसेन किहानी यांचे आव्हान आहे. जिन्सॉन जॉन्सन दुहेरी सुवर्णपदकासाठी उत्सुक असून त्याच्यापुढे जन्माने आफ्रिकन असलेल्या महम्मद तिओली (बहरीन), अब्राहम रोटीच (बहरीन), अब्दुला अबुबाकर (कतार), जमाल हैराने (कतार) याशिवाय इराणच्या आमीर मोरादी, जपानच्या शो कवामोतो यांचे आव्हान आहे. पुरुष 4-400 मीटर रिलेत मात्र भारतीय संघ कतार आणि बहरीनवर वरचढ ठरू शकतो. 

हिमा विरुद्ध सल्वा नासेर 
हिलांच्या चारशे मीटर शर्यतीत विश्‍व क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बहरीनच्या सल्वा नासेर आणि ज्युनिअर विश्‍वविजेत्या हिमा दास यांच्यातील शर्यत स्पर्धेचे एक आकर्षण असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत सल्वा नासेरने हिमावर लिलया मात केली होती. तसेच परिक्षा आणि अन्य कारणामुळे हिमाच्या तयारीत 40 दिवसांचा खंड पडल्याने खरेच ती सल्वापुढे आव्हान निर्माण करू शकेल का, हा प्रश्‍न आहे. याशिवाय द्युती चंद, पी. यु. चित्रा, संजीवनी जाधव, लिली दास, अनू राणी (भालाफेक), स्वप्ना बर्मन (हेप्टथलॉन) यासुद्धा पदकाच्या शर्यतीत आहे. 4-400 मीटर रिले संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असला तरी प्रथम होणाऱ्या मिश्र रिलेत भारतापुढे पुन्हा एकदा बहरीनचे आव्हान असेल. 

महत्वाचे 
- नीरज चोप्रा, ए. धारुन, श्रीशंकर, मंजीत सिंग, निना पिंटो यांची दुखापतीमुळे माघार 
- यामुळे ताजींदरसिंग तूर, अविनाश साबळे, जिन्सॉन जॉन्सन यांच्यावर सुवर्णपदकाची मदार 
- सुवर्णपदक विजेते थेट सप्टेंबर महिन्यात येथेच होणाऱ्या विश्‍व स्पर्धेसाठी पात्र 
- येथील कामगिरी विश्‍व मानांकनासाठी उपयोगी ठरेल 
- भारत 20 पदके जिंकेल असा मुख्य प्रशिक्षक बहादूर सिंग यांना विश्‍वास. 
- उन्हाचा व दमटपणाचा त्रास होऊ नये यासाठी खलीफा स्टेडियममध्ये विशिष्ट पद्धतीची वातानुकुलीत यंत्रणा बसविण्यात आली आहे. 

भारताची गतस्पर्धेतील कामगिरी 
12 सुवर्ण, 5 रौप्य, 12 ब्रॉंझ 

आजच्या प्रमुख अंतिम शर्यती 
महिला : भालाफेक (अनू राणी), 400 मीटर (हिमा, पुवम्मा), 5000 मीटर (संजीवनी जाधव) 
पुरुष : 3000 स्टीपलचेस (अविनाश साबळे, शंकरलाल स्वामी), 10000 मीटर (मुरली गावीत).


​ ​

संबंधित बातम्या