चाहतेच ओढतायंत हिमाचे पाय

ज्ञानेश भुरे
Wednesday, 29 August 2018

भारतात राहून टिका करणाऱ्या दोघा व्यक्तींमुळे आपण 200 मीटर शर्यतीवर लक्ष केंद्रित करू शकलो नाही, अशी बातमी सकाळी येऊन धडकली. एकीकडे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत असतानाच आपल्याच देशातील चाहते म्हणा किंवा तज्ज्ञ आपल्याच खेळाडूंचे पाय मागे ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे ऐकून विचित्र वाटले. 

भारतात राहून टिका करणाऱ्या दोघा व्यक्तींमुळे आपण 200 मीटर शर्यतीवर लक्ष केंद्रित करू शकलो नाही, अशी बातमी सकाळी येऊन धडकली. एकीकडे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत असतानाच आपल्याच देशातील चाहते म्हणा किंवा तज्ज्ञ आपल्याच खेळाडूंचे पाय मागे ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे ऐकून विचित्र वाटले. 

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या आदल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी प्रयत्नांची शिकस्त करत जाकार्तात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकाचे अर्धशतक गाठले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडत हिमाने ऍथलेटिक्‍स क्रीडा प्रकाराला जवळ केले आहे. जागतिक स्पर्धेत कुमार गटात सुवर्णपदक मिळवून तिने चुणूक दाखवली.

त्यानंतर आशियाई स्पर्धेत पदार्पणातच तिने 400 मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळविले. त्यानंतर 200 मीटर शर्यतीत तिच्याकडून आणखी एका पदकाची अपेक्षा होती. सर्वांच्या नजरा तिच्या उपांत्य फेरीकडे असतानाच चुकीच्या सुरवातीमुळे ती अपात्र ठरली. गोविंदन लक्ष्मणनचे ब्रॉंझपदक रिप्ले बघून काढून घेण्यात यावे इतकीच ही निराश करणारी घटना होती. या शर्यतीनंतर लगेच पहिली वहिली 400 मीटर रिले शर्यत असल्याने हिमाने हे अपयश खिलाडूवृत्तीने घेतले. पण, या मागे वेगळेच काही दडले होते. पुढे तिने 400 मीटर रिले शर्यतीत रौप्यपदकही पटकावले. 

तोवर हिमाच्या मनात काय सुरू होते कुणालाच माहित नव्हते. दिवसाचा कार्यक्रम केल्यावर हिमाने फेसबुक लाईव्ह द्वारे संपर्क साधला तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या. माझ्या कामगिरीबाबत निरर्थक वक्तव्य केल्याने आपण प्रचंड दबावाखाली होतो. आशियाई स्पर्धेसारख्या मोठ्या व्यासपीठावर उभे असताना कोणताही खेळाडू इतका दबाब सहन करू शकणार नाही. त्यांच्या वक्तव्यामुळेच मी निराश झाले होते. याच दबावाखाली माझ्याकडून चुकीची सुरवात झाली, असे हिमाचे म्हणणे होते. 

हिमाविषयी कोण काय बोलले हे समोर येत नसले, तरी एका वाहिनीवर आशियाई स्पर्धेचे विश्‍लेषण करणाऱ्या तज्ज्ञांनी हिमा उत्तेजकाचे सेवन करते आणि त्यामुळेच तिला असे यश मिळत आहे असे सांगितल्याची चर्चा दबक्‍या आवाजात होत आहे. तिच्या अनेक चाचण्या झाल्या असेही म्हणण्यात आल्याचे समजते. आपलाच खेळाडू पुढे जात असेल, तर त्याचे कौतुक करण्याचे सोडून अशी वक्तव्य करणे म्हणजे देशात थोड्याफार प्रमाणात असणाऱ्या क्रीडा संस्कृतीला धक्काच आहे. किमान राष्ट्रीय क्रीडा दिनी तरी असे व्हायला नको होते. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देताना किंवा स्विकारताना मैदानात घाम गाळणाऱ्या खेळाडूविषयी प्रेम नसेल, तर सहानुभूती तरी मिळायला हवी.


​ ​

संबंधित बातम्या