Asian Games 2018 : द्युती, हिमा, महंमदची 'रुपेरी' धाव 

वृत्तसंस्था
Sunday, 26 August 2018

हिमाने शनिवारी 51 सेकंद वेळ देताना राष्ट्रीय विक्रमासह अंतिम फेरी गाठली होती. तिने चेन्नईत 2004 मध्ये मनजित कौर हिचा 51.05 सेकंदांचा विक्रम मोडला. आज दुसऱ्याच दिवशी तिने पुन्हा राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. मात्र, तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. 

जाकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी भारताच्या धावपटूंनी रुपेरी यश मिळविले. सर्वप्रथम हिमा दास आणि महंमद अनस यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळविले. त्यानंतर द्युती चंद शंभर मीटर शर्यतीत रौप्यपदकाची मानकरी ठरली. पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत मात्र भारताचा गोविंदन लक्ष्मणन अपात्र ठरल्याने भारताचे ब्रॉंझपदक हुकले. 

हिमा आणि महंमद यांच्या रौप्यपदकाचे कौतुक होत असतानाच द्युतीने आपल्या कामगिरीने त्यावर कळस चढवला. तब्बल 32 वर्षांनी भारताने आशियाई स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळविले. त्या वेळी 1986 मधील स्पर्धेत पी. टी. उषाने 11.67 सेकंदांसह रौप्यपदक जिंकले होते. ही कामगिरीदेखील द्युतीने सहज खोडून काढली. त्यानंतर 1998च्या स्पर्धेत भारताची रचिता मिस्त्री याच स्पर्धा प्रकारात ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली होती. 

द्युतीच्या यशाचे विशेष कौतुक म्हणजे दोन वर्षांपूर्वी लिंग चाचणीत तिला दोषी ठरविण्यात आले होते. त्यानंतर द्युतीने या कारवाईला आव्हान देत क्रीडा लवादाकडे आपली बाजू समर्थपणे मांडत न्याय मिळविला होता. त्यानंतर घेतलेल्या कठोर मेहनतीचे फळ मिळाले आणि आपली योग्यता दाखवून दिली, अशी प्रतिक्रिया द्युतीने व्यक्त केली. 

हिमाने शनिवारी 51 सेकंद वेळ देताना राष्ट्रीय विक्रमासह अंतिम फेरी गाठली होती. तिने चेन्नईत 2004 मध्ये मनजित कौर हिचा 51.05 सेकंदांचा विक्रम मोडला. आज दुसऱ्याच दिवशी तिने पुन्हा राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. मात्र, तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. 

महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत द्युतीने 11.43 सेकंद वेळ देताना अंतिम फेरी गाठली होती. पहिल्या उपांत्य फेरीत ती ओल्गा सॅफ्रोनावा (11.42) आणि बहारिनची हजार अल्खडी (11.42) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाने अंतिम फेरीत पोचली होती. अंतिम फेरीत तिला बहारिनच्या ओडिओंगचे आव्हान होते. सातव्या लेनमधून द्युती सुसाट सुटली होती. ओडिओंगही तितक्‍याच वेगाने पुढे येत होती. अंतिम रेषेवर चौघी धावपटू एकत्रच आल्यामुळे निकालाबद्दल संभ्रम होता. अखेर फोटो फिनिशमध्ये ओडिओंग (11.30 सेकंद)आधी पोचल्याचे दिसून आले. त्यानंतरही दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाबाबतही तीच अडचण होती. मात्र, द्युतीने (11.32 सेकंद) चीनच्या वेई योंगली हिला शतांश एका सेकंदाने मागे टाकत रौप्यपदक मिळविले. 


​ ​

संबंधित बातम्या