जागतिक मैदानी स्पर्धा : अखेर हिमा दासची दोहा बस हुकलीच 

नरेश शेळके
Thursday, 19 September 2019

दोहा येथे जागतिक मैदानी स्पर्धेला सुरुवात होण्यास अवघे सात दिवस शिल्लक असताना देश, इव्हेंटनिहाय प्रवेशिका आज जाहीर करण्यात आली. त्यानुसार 'ढिंग एक्‍स्प्रेस' हिमा दास भारताकडून सहभागी होणार नाही, हे स्पष्ट झाले. कारण, तिचा महिला 4-400 किंवा मिश्र रिलेत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हिमाच्या सहभागाविषयी संभ्रमाचे जे वातावरण होते, ते आता निवळले आहे.

दोहा येथे जागतिक मैदानी स्पर्धेला सुरुवात होण्यास अवघे सात दिवस शिल्लक असताना देश, इव्हेंटनिहाय प्रवेशिका आज जाहीर करण्यात आली. त्यानुसार "ढिंग एक्‍स्प्रेस' हिमा दास भारताकडून सहभागी होणार नाही, हे स्पष्ट झाले. कारण, तिचा महिला 4-400 किंवा मिश्र रिलेत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हिमाच्या सहभागाविषयी संभ्रमाचे जे वातावरण होते, ते आता निवळले आहे. त्याचप्रमाणे हिमाच्याच चारशे मीटर शर्यतीत दोनदा पात्रता गाठूनही प्रथम संघात निवड न झालेल्या हरियानाच्या अंजली देवीची प्रवेशिका पाठविण्यात आली आहे. 

ज्युनिअर विश्‍वविजेतेपद, राष्ट्रकुल आणि त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीमुळे हिमाकडून प्रचंड अपेक्षा करण्यात येत होती. एप्रिल महिन्यात दोहा येथेच झालेल्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत तिच्या पाठदुखीने डोके वर काढले. त्यामुळे तिला शर्यतीतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर ती सरावासाठी युरोपच्या दौऱ्यावर गेली. तिथे क्‍लबपातळीवरील स्पर्धेत दोनशे मीटर शर्यतीत पाच आणि चारशे मीटर शर्यतीत एक सुवर्णपदक जिंकल्याने क्रीडाप्रेमी चांगलेच सुखावले होते. यानंतरही तिला वैयक्तिक चारशे मीटरसाठी पात्रता गाठण्यात अपयश आले. त्यानंतर तिला रिले पळविण्याचा अट्टहास सुरू होता. मात्र, दुखापत चिघळल्याने ती सहभागी होणार नाही, यावर आज शिक्कामोर्तब झाले. तिच्या अनुपस्थितीत मिश्र रिलेत जिस्ना मॅथ्यू, पुवम्मा आणि व्ही. के. विस्मया या तीन महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे चारशे मीटर हर्डल्स शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर ए. धारुनच्या दुखापतीविषयी चर्चा सुरू होती. मात्र, त्याचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघात आता 16 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे. महासंघाने 9 तारखेला 25 सदस्यीय संघ जाहीर केला होता. त्या वेळी द्युतीचंद आणि अंजली देवीचा समावेश नव्हता. द्युतीला पात्रता गाठता आली नव्हती. मात्र, जागतिक मानांकनानुसार ती स्पर्धेसाठी पात्र ठरली. 

ऍलीसन फेलीक्‍स, गार्सिया इतिहास घडविणार 
अमेरिकेची ऍलीसन फेलीक्‍स जागतिक मैदानी स्पर्धेत सर्वाधिक पदके (16) जिंकणारी ऍथलिट्‌स असून, सर्वाधिक सुवर्णपदके (11) जिंकणाऱ्यांत ती उसेन बोल्टसोबत संयुक्तपणे आघाडीवर आहे. अशी ही ऍथलिट यंदा 4-400 रिलेत सहभागी होत आहे. त्याचप्रमाणे स्पेनचा 50 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीतील स्पर्धक जेसस अँजेल गार्सिया 28 तारखेला सहभागी होईल, त्या वेळी तो सर्वाधिक वयाचा स्पर्धक ठरेल. 1993 मध्ये विश्‍वविजेतेपद मिळविणाऱ्या गार्सियाची ही विक्रमी 13वी स्पर्धा असेल. 

सहभागी देश : 209 
पुरुष : 1015 
महिला : 983 
44 पैकी 38 विद्यमान विजेते सहभागी


​ ​

संबंधित बातम्या