जागतिक कॅडेट कुस्तीत सोनमला सुवर्णपदक; चीनच्या बिनबिनवर 7-1 ने मात

वृत्तसंस्था
Friday, 2 August 2019

सोनमचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक. गतवर्षी तिने याच स्पर्धेत 65 किलो गटात ब्रॉंझ जिंकले होते. यंदा तिने गट बदलला आणि कामगिरीही उंचावली.

मुंबई : हरयाणाची कुस्तीपटू सोनम मलिक हिने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिने या स्पर्धेतील भारतीय मुलींचे पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम करताना 65 किलो गटात बाजी मारली. 

सोफिया (बल्गेरिया) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोनमने निर्णायक लढतीत चीनच्या झिआँग बिनबिन हिचा 7-1 असा पराभव केला. पहिल्या सत्रात सोनमने 1-0 आघाडी घेतली, ती प्रतिस्पर्धीच्या चुकीमुळे. दुसऱ्या सत्राच्या सुरवातीस झालेल्या झटापटीत सोनम सरस ठरली आणि तिने आघाडी 3-0 वाढवली. याच सत्रातील एक मिनिट असताना सोनमने प्रतिस्पर्धीस खाली खेचत चार गुण मिळवत सुवर्णपदक निश्‍चित केले. 

सोनमचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक. गतवर्षी तिने याच स्पर्धेत 65 किलो गटात ब्रॉंझ जिंकले होते. यंदा तिने गट बदलला आणि कामगिरीही उंचावली. तिने सुरवातीच्या फेऱ्यातही एकतर्फीच विजय मिळवताना अमेरिका आणि रशियाच्या प्रतिस्पर्धीस हरवले होते. सोनमने भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले; पण त्यापूर्वी उदीत (48 किलो), अमन (55 किलो), मनीष गोस्वामी (65 किलो), अनिरुद्ध कुमार (110 किलो) यांनी ब्रॉंझ जिंकले आहे. 

माधुरी पटेल हिला 43 किलो गटाच्या ब्रॉंझ पदकाच्या लढतीत हार पत्करावी लागली. युक्रेनच्या ऐदाकेरिमोवा हिने तिला 8-0 असे हरवले. उपांत्य फेरीत पराजित झाल्यानंतर माधुरी ब्रॉंझची रिपेचेज लढत गमावली. पूजाला 73 किलो गटातील ब्रॉंझ पदकाच्या लढतीत स्वीडनच्या हॅना एलिनॉर फ्रिदलुंद हिच्याविरुद्ध 2-3 अशा पराभवास सामोरे जावे लागले. प्राथमिक फेरीतील पराभवानंतर रिपेचेज जिंकत पूजाने ब्रॉंझची संधी निर्माण केली होती. दरम्यान, अंतिम 49 किलो गटात रिपेचेजमध्ये पराजित झाली. प्रियांकाला 57 किलो गटाच्या सलामीलाच पराभूत व्हावे लागले. 

कोमललाही 'सुवर्ण' संधी 
कोमलने 40 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्य फेरीतत जपानच्या मिऊ ओबाता हिचे आव्हान 10-9 असे परतवले. त्यापूर्वी तिने उपांत्यपूर्व फेरीत तुर्कीच्या झोझान ऍकार हिला 6-0, तर इटलीच्या मिशेल चेस्सा हिला प्राथमिक फेरीत 10-0 असे हरवले होते. दरम्यान, हन्नी कुमारी हिला 46 किलो गटात ब्रॉंझपदक जिंकण्याची संधी आहे. रिपेचेजद्वारे तिने ही संधी निर्माण केली. हीच संधी भाग्यश्री फंड हिला 61 किलो गटात आहे. ती उपांत्य फेरीत युक्रेनच्या युलिया लेस्कोवेत्स विरुद्ध 2-6 पराभूत झाली.


​ ​

संबंधित बातम्या