द्रविडला फोन केला.. मैदानात उतरलो आणि... : विहारी

वृत्तसंस्था
Monday, 10 September 2018

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात फलंदाज हनुमा विहारीला भारतीय संघात स्थान देण्यात आले. त्याने संयमी 56 धावा करत मिळालेल्या संधीचे सोने केले. सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांना केलेला फोन हेच त्याच्या संयमाचे गुपित असल्याचे त्याने सामन्यानंतर स्पष्ट केले. 

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात फलंदाज हनुमा विहारीला भारतीय संघात स्थान देण्यात आले. त्याने संयमी 56 धावा करत मिळालेल्या संधीचे सोने केले. सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांना केलेला फोन हेच त्याच्या संयमाचे गुपित असल्याचे त्याने सामन्यानंतर स्पष्ट केले. 

अखेरच्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताची परिस्थिती 103/4 अशा असताना विहारी फलंदाजीला आला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने थाटात आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याच्या खेळीविषयी बोलताना तो म्हणाला, ''कसोटी सामन्यात पदार्पण करण्यापूर्वी आदल्या दिवशी मी राहुल द्रवि़ड यांना फोन केला. त्यांनी माझ्याशी काहीवेळ चर्चा केली. त्यांच्या सल्ल्यांमुळे माझ्यावरील दडपण कमी झाले. माझ्याकडे कला आहे, माझा स्वभाव आणि मानसिकता सकारात्मक असल्याचे सांगत त्यांनी मला फक्त मैदानावर खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला.''

''मला सारे श्रेय द्रविड यांना द्यायचे आहे कारण माझ्या भारत अ संघाच्या प्रवासात त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा मला अत्यंत उपयोग झाला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी एक उत्तम खेळाडू बनू शकलो,'' असे मत विहारीने व्यक्त केले.  

फलंदाजी करत असताना विराट कोहलीने माझा आत्मविश्वास वाढवला असेही त्याने सांगितले. तो म्हणाला, ''खेळपट्टीवर निर्णय घेण्यात मला अडचणी येत होत्या मात्र दुसऱ्या बाजूने खेळत असलेल्या विराट कोहलीने मला प्रचंड मदत केली. त्याच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे माझा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.''

पुढील प्रवासाबद्दल बोलताना तो म्हणाला, '' ही फक्त सुरवात आहे. भारतीय संघात माझे स्थान पक्के करण्यासाठी मला अजून खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. तसेच सातत्याने चांगली कामगिरी करावी लागणार आहे.''


​ ​

संबंधित बातम्या