इंग्लंड दौऱ्यासाठीचा पाकचा निम्मा संघ कोरोना बाधित 

टीम ई-सकाळ
Tuesday, 23 June 2020

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवड केली होती. मात्र पाक संघाने इंग्लंड दौऱ्यासाठी जो संघ निवडला होता त्यांच्यातीलच अजून सात खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

रावळपिंडी : कोरोना विषाणूच्या संकटामुळे क्रिडा क्षेत्रावर मोठे संकट कोसळले आहे. या संकटातून सावरुन खेळाडू पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज होत असताना पुन्हा धोक्याचा इशारा मिळत असल्याचे चित्र समोर येत आहे. वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला असून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेस लवकरच सुरवात होणार आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट संघानेही इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची तयारी केली असतानाच आता, संघातील तीन खेळाडूंच्या नंतर आणखीन सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. 

मदतीसाठी कोर्टवर उतरले अन जोकोविचसह 'हे' टेनिसपटू कोरोनाच्या जाळ्यात अडकले 

कोरोनानंतर एका बाजूला क्रिकेट पुन्हा पुर्वपदावर आणण्याच्या हालचाली सुरु असताना, अनेक खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे सध्याच्या स्थितीला खेळ जगतात चिंता निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवड केली होती. मात्र पाक संघाने इंग्लंड दौऱ्यासाठी जो संघ निवडला होता त्यांच्यातीलच अजून सात खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान व वहाब रियाज या सात खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. 

तर यापूर्वी  हैदर अली, हॅरिस रउफ आणि शदाब खान या तीन खेळाडूंना कोरोना झाल्याचे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने म्हटले होते. तसेच या तीनही खेळाडूंमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात सांगितले होते. या महिन्याच्या शेवटी पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार होता. त्यापूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आता पुन्हा इतर सात खेळाडूंचे कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने पाकिस्तानच्या क्रिकेट संघात एकच खळबळ उडाली आहे.  

आता 'या' फुटबॉल लीगमध्ये सामन्यापूर्वी खेळाडू आढळला कोरोना पॉझिटिव्ह          

दरम्यान, पाकिस्तानच्या संघातील अबिद अली, असद शफिक, अझहर अली, बाबर आझम, फहीम अश्रफ, फवाद आलम, इमाम उल हक, खुश्दील शहा, मोहम्मद अब्बास, नसीम शहा, सरफराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, यासिर शहा आणि इफ्टीयार अहमद या खेळाडूंचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.      

 

                


​ ​

संबंधित बातम्या