विरुष्काच्या घरी पाळणा हलणार, खुद्द कोहलीनं चाहत्यांना दिली गुड न्यूज!

सुशांत जाधव
Thursday, 27 August 2020

डिसेंबर 2017 मध्ये या जोडीनं प्रेमाच्या चर्चेला पूर्ण विराम देत इटलीमध्ये मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत शाही विवाह केला होता.   

सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानातील बाप माणूस असलेला विराट कोहली लवकरच बाबा होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुणा येणार आहे. खुद्द कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना गूड न्यूज दिलीय. ट्विटरच्या माध्यमातून त्याने अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केलाय. जानेवारी 2021 मध्ये आमच्या घरी तिसरा सदस्य येईल,  असा उल्लेखही त्याने आपल्या ट्विटमध्ये केलाय. विराट आणि अनुष्का या जोडीच्या प्रेमाची चर्चा चांगलीच रंगली होती. डिसेंबर 2017 मध्ये या जोडीनं प्रेमाच्या चर्चेला पूर्ण विराम देत इटलीमध्ये मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत शाही विवाह केला होता.   

विराट-अनुष्का यांच्या प्रेमात चढउताराचे प्रसंग आले. अनेक अफवा उठल्या. या दोघांची पहिली भेट एका जाहीरातीच्या शूटदरम्यान झाली होती. मग मैत्री-प्रेम आणि ब्रेकअपच्या चर्चेनंतर  दोघांनी आयुष्याची लग्नबंधनात अडकून बहरदार इनिंग सुरु केल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीने एका मुलाखतीमध्ये अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला होता. 2013 मध्ये एका शेम्यूच्या जाहीरातीमध्ये अनुष्कासोबत स्क्रिन शेअर करावी लागणार असल्याचे कळल्यानंतर धडकी भरली होती, असे त्याने सांगितले होते. सेटवर अनुष्का माझ्यापेक्षा उंचत दिसत होती. त्यावेळी यापेक्षा अधिक  उंच टाचेचं चप्पल भेटले नाही का? असा विनोदी प्रश्न अनुष्काला केल्याचा किस्साही त्याने शेअर केला होता. त्यानंतर दोघांच्यातील मैत्री वाढत गेली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले.  

ही जोडी अनेकवेळा एकमेकांचे समर्थन करताना दिसली. त्यानंतर दोघांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या. इंग्लंड दौऱ्यावर विराटच्या फ्लॉपशोला अनुष्का कारणीभूत असल्याचेही बोलले गेले. एवढेच नाही तर अनुष्काच्या बोल्ड फोटो शूटवर विराट नाराज असल्याचे मथळेही सजले. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो करत प्रेमात दुरावा असल्याच्या चर्चेला आणखी उधाण आले. मात्र शेवट गोड झाला आणि ही जोडी आयुष्यभरासाठी एक झाली.  


​ ​

संबंधित बातम्या