चहलच्या बायकोनं धवनला नाचवलं; व्हिडिओ व्हायरल

टीम सकाळ स्पोट्स
Wednesday, 31 March 2021

धनश्रीने देखील आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन एका खास कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे.

भारतीय संघातील अनुभवी सलामीवीर मैदानातील आपल्या कामगिरीशिवाय मैदानाबाहेरील हटके अंदाजानेही चर्चेत असतो. क्रिकेटच्या मैदानात एखाद्या फलंदाजाचा झेल टिपल्यानंतर शड्डू ठोकून आनंद व्यक्त करणे हे तर त्याचं स्टाईल स्टेटमेंटच झालंय. अनेकदा सीमारेषेवर फिल्डिंग करताना प्रेक्षकांच मनोरंजन करण्याच्या उद्देशाने तो भांगडा करतानाही पाहायला मिळाले आहे. आता त्याचा एक व्हिडिओ चर्चेत आलाय. या व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत तो भांगडा करताना दिसतोय.

शिखर धवन याने सोशल मीडियावरील लोकप्रिय माध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवरुन हा खास व्हिडिओ शेअर केलाय. धनश्रीने देखील आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन एका खास कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने या डान्सला गब्बरच्या स्टाईलमधील भांगडा असे नाव दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून 3 लाखांहून अधिक लोकांनी याला पसंती दिली आहे.  
 

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माही डेंटिस्टसह कोरिओग्राफर आणि युट्यूबरही आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा फॅन फॉलोवर्स असल्याचेही पाहायला मिळते. इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यावर धनश्री युजवेंद्र चहलसोबत होती. आयपीएल दरम्यानही ती युजीसोबत असणार आहे. धवनने इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत 98 आणि 67 धावा करुन आयपीएलसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले होते. लवकरच तो दिल्लीच्या ताफ्यात सामील होणार आहे. 10 एप्रिल रोजी धवनच्या दिल्ली कॅपिटल्सची पहिली लढत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रंगणार आहे.   

 


​ ​

संबंधित बातम्या