राम मंदिराबद्दल पोस्ट केल्यानंतर धमक्या ; क्रिकेटपटू शमीच्या पत्नीची पोलिस सुरक्षेची मागणी

टीम ई-सकाळ
Monday, 14 September 2020

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने कोलकाता उच्च न्यायालयात स्वत: साठी अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने कोलकाता उच्च न्यायालयात स्वत: साठी अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. हसीन जहांने राम मंदिर निर्मितीसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले होते. त्याबाबत अज्ञातांकडून धमकी मिळत असल्याचे म्हणत, हसीन जहांने कोलकाता उच्च न्यायालयात आपली मुलगी व स्वत:च्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे. 

अयोध्या मधील राम मंदिराच्या भूमीपूजनानंतर हसीन जहांने सोशल मीडियावर शुभेच्या दिल्या होत्या. यामुळे हसीन जहांला कट्टरतावाद्यांचा रागदेखील सहन करावा लागला होता. मात्र त्या पोस्टनंतर आपल्याला बलात्काराच्या धमक्याही मिळत असल्याचा आरोप हसीनने केला होता. व त्यासाठी हसीन जहांने 9 ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. परंतु या तक्रारीवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप हसीनने केला असून, आता कोलकाता उच्च न्यायालयात संरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे. 

हसीन जहांने सोशल मीडियावर राम मंदिर बाबत दिलेल्या शुभेच्या नंतर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. परंतु बलात्काराची धमकी आल्यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची विनंती केली होती. हसीन जहांने केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकेल. 

यापूर्वी हसीन जहांने आपण पश्चिम बंगालमध्ये असल्यामुळेच सुरक्षित असल्याचे म्हटले होते. परस्पर वादामुळे मोहम्मद शमी आणि हसीन हे वेगळे राहत आहेत. हसीन जहां सध्या पश्चिम बंगालमध्ये आपल्या नातेवाईकांकडे राहत आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या