सॅमसनची धोनीशी तुलना ; गंभीर यांनी शशी थरूरांना सुनावले  

टीम ई-सकाळ
Tuesday, 29 September 2020

आयपीएल मध्ये काल झालेल्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने किंग्स इलेव्हन पंजाब संघावर विजय मिळवला.

आयपीएल मध्ये काल झालेल्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने किंग्स इलेव्हन पंजाब संघावर विजय मिळवला. या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना  224 धावांचे लक्ष  राजस्थान रॉयल्सला दिले होते. आणि त्यानंतर राजस्थान रॉयल्सने कर्णधार स्मिथ, राहुल तेवतिया आणि संजू सॅमसन यांच्या जोरावर हा सामना आपल्या खिशात घातला होता. या सामन्यात राजस्थान कडून संजू सॅमसनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर त्यापूर्वीच्या चेन्नई विरुद्ध सामन्यात त्याने 32 बॉल मध्ये 74 धावा केल्या होत्या. त्यामुळे संजू सॅमसनच्या या दमदार खेळीमुळे क्रिकेट जगतातील अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सॅमसनची तुलना महेंद्रसिंग धोनीशी केली. मात्र त्यांच्या या कमेंटवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीरने प्रत्युत्तर दिले आहे. 

पंजाब सोबत झालेल्या सामन्यात संजू सॅमसनने धमाकेदार कामगिरी केली होती. त्यानंतर शशी थरूर यांनी सोशल माध्यमावरील ट्विटरवर संजू सॅमसनच्या कामगिरीची प्रशंसा करताना त्याची तुलना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तुलना महेंद्रसिंग धोनीशी केली. तसेच या ट्विट मध्ये शशी थरूर यांनी आपण संजू सॅमसनला एका दशकापासून ओळखत असल्याचे म्हटले आहे. आणि शिवाय संजू सॅमसन 14 वर्षांचा असताना आपण त्याला पुढचा महेंद्रसिंग धोनी होणार असल्याचे सांगितले होते, असे शशी थरूर यांनी या ट्विट मध्ये पुढे लिहिले आहे. याव्यतिरिक्त आयपीएल मधील दोन सामने झाल्यानंतर जागतिक दर्जाचा खेळाडू आला असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. 

शशी थरूर यांच्या या ट्विट नंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने थरूर यांचे ट्विट पुन्हा रिट्विट करत, संजू सॅमसनला पुढचा महेंद्रसिंग धोनी होण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. शिवाय गंभीरने या ट्विट मध्ये सॅमसन हा भारतीय क्रिकेटचा संजू सॅमसनच असणार असल्याचे नमूद केले आहे.  गौतम गंभीरनंतर श्रीशांतनेही शशी थरूर यांच्या ट्विटवर उत्तर देताना, तो पुढील धोनी नसून संजू सॅमसनच राहणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, यंदाच्या आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे आत्तापर्यंत दोन सामने झाले आहेत. आणि या दोन्ही सामन्यांमध्ये राजस्थानने 200 च्या वर धावसंख्या उभी केली होती. चेन्नई सुपर किंग्स सोबत प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 216 धावांचे लक्ष उभे केले होते. तर काल पंजाब विरुद्धच्या सामन्यात राजस्थानने 224 धावांचे लक्ष गाठले होते. व या दोन्ही सामन्यांमध्ये संजू सॅमसनने अर्धशतकीय खेळी करत चमक दाखवली होती. चेन्नई विरुद्ध त्याने 32 बॉल मध्ये 74 धावा केल्या होत्या. तर पंजाब सोबतच्या सामन्यात 42 बॉल मध्ये 85 धावा केल्या होत्या. 
               


​ ​

संबंधित बातम्या