दोघांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट; विष्णू-ज्वालाचं प्रेम लग्नापर्यंत पोहचलं

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 14 April 2021

दोघांच्या कुटुंबियासह काही मोजक्या मित्र  मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडणार आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा  प्रसिद्ध अभिनेता विष्णू विशालशी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर आता 22 एप्रिल रोजी हे स्वीट कपल लग्न करणार आहे. विष्णूने सोशल मीडियावरुन लग्नपत्रिकेचा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय. दोघांच्या कुटुंबियासह काही मोजक्या मित्र  मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून ज्वाला आणि विष्णू एकमेकांसोबत डेट करत होते. सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाची चर्चा रंगल्यानंतर दोघांनी ना..ना..करत फुलत असलेल्या प्रेमाची कबूली दिली होती. 'जीवन हा एक प्रवास आहे, त्याचा आनंदाने स्वीकार करा. नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे', या कॅप्शनसह विष्णूने लग्नपत्रिका पोस्ट करत नवी इनिंग सुरु करण्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. या पोस्टवर दोघांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसताहेत.  

मुंबईच्या विजयानंतर शाहरुख खान म्हणाला...

ज्वाला गुट्टाने आतापर्यंत कॉमनवेल्थ, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई चॅम्पियनशिप यांसारख्या स्पर्धांमध्ये अनेक पदकं पटकावली आहेत. 2010 मध्ये तिने कॉमनवेल्थ स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं होतं. तर विष्णू विशाल हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. 

ज्वालाने 2005 मध्ये बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी लग्न केलं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. 2011 मध्ये दोघांमध्ये घटस्फोट झाला.  दुसरीकडे विष्णूचही 2011 मध्ये  रजनी नटराजनशी लग्न झालं होते. ही दोघ 2018 मध्ये विभक्त झाले. 2019 पासून ज्वाला आणि विष्णूच्या प्रेमाची चर्चा रंगत होती. ज्वाला सोशल मीडियावरुन विष्णूसोबतचे काही खास फोटोही शेअर करताना पाहायला मिळाले होते. 


​ ​

संबंधित बातम्या