गडहिंग्लज फुटबाॅल स्पर्धेत गोवा विरुद्ध सिकंदराबाद अंतिम झुंज 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर गेल्या चार दिवसांपासून ही स्पर्धा सुरू आहे. उद्या (ता. 5) दुपारी अडीच वाजता अंतिम सामना होणार आहे.

गडहिंग्लज - युनायटेड ट्रॉफी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज गोव्याच्या कलंगुट असोसिएशन आणि सिकंदराबाद रेल्वे क्‍लबने प्रतिस्पर्ध्यांवर मात करून अंतिम फेरी गाठली. चेन्नईचा चेन्नईन एफसी आणि पुण्याचा बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) यांचे आव्हान आज उपांत्य फेरीत संपुष्टात आले.

येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर गेल्या चार दिवसांपासून ही स्पर्धा सुरू आहे. उद्या (ता. 5) दुपारी अडीच वाजता अंतिम सामना होणार आहे. 

पहिल्या सामन्यात सिकंदराबाद रेल्वे संघाने अनुभवाच्या जोरावर युवा खेळाडूंचा भरणा असणाऱ्या चेन्नईला टायब्रेकरमध्ये 4-2 असे नमवून आगेकूच केली. सुरुवातीला चेन्नईच्या खेळाडूंनी शॉर्ट पासिंग करून सिकंदराबादच्या गोलक्षेत्रात चेंडू ठेवण्यात यश मिळविले.

दोन्ही बगलेतून होणाऱ्या चढायांमुळे सिकंदराबादच्या बचावपटूंना घाम फुटला. 16व्या मिनिटाला चेन्नईच्या प्रसन्नने गोलक्षेत्राबाहेरून उत्कृष्ट फटक्‍याद्वारे गोल नोंदवून आघाडी घेतली. यानंतर सिकंदराबादने अधिक सूत्रबद्ध खेळ केला. 24व्या मिनिटाला सिकंदराबादच्या जॉनीने मैदानी गोल करून बरोबरीसह सामन्यातील अस्तित्व टिकवून ठेवले. 

उत्तरार्धात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी ईर्ष्येने खेळ केला. परंतु, समन्वयाअभावी अखेरपर्यंत बरोबरीची कोंडी फुटली नाही. पंचांनी अखेर सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय घेतला. यात सिकंदराबादतर्फे अल्फ्रेड, बी. संतोष, जॉन, मज्जिद यांनी तर चेन्नईच्या हर्ष, शिशांक यांनी गोल केले. सिकंदराबादचा गोलरक्षक हेमंत हा चेन्नईनच्या साजन आणि निशोक यांचे पेनल्टीचे फटके अडवून विजयाचा बाजीगर ठरला. 

अटीतटीच्या सामन्यात गोव्याने पुण्याला उत्तरार्धात नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. केरळला नमवून उपांत्यफेरीत आलेल्या पुण्याला पूर्वार्धात सूरच गवसला नाही. तुलनेत गोव्याने बहुतांश वेळ चेंडूवर नियंत्रण राखून सामन्यावर वर्चस्व मिळविले. उत्तरार्धात गोव्याच्या अल्फ्रेड डिसा याने 65 व्या मिनिटाला गोलक्षेत्राबाहेरून जोरदार फटक्‍याद्वारे पहिला गोल केला.

सामना संपण्यास दोन मिनिटे असताना चंदन गोवेकरने मैदानी गोल करून संघाचा 2-0 असा विजय निश्‍चित केला. अल्फ्रेड डिसा (गोवा), जॉन (सिकंदराबाद) यांचा सामनावीर, तर पुण्याचा प्रताप तमंग, प्रसन्न (चेन्नईन) यांचा लढवय्या खेळाडू म्हणून सत्कार झाला. अंतिम सामन्यानंतर उद्या आमदार हसन मुश्रीफ, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव सावटर वाझ, रियाज शमनजी, सतीश घाळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार असल्याचे युनायटेडचे अध्यक्ष अरविंद बारदेस्कर, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद यांनी सांगितले. 

आजचे सामने 

1. तिसऱ्या क्रमांकाचा सामना : चेन्नईन एफसी विरुद्ध बीईजी पुणे (दुपारी 1 वाजता) 
2. अंतिम सामना : गोवा कलंगुट विरुद्ध सिकंदराबाद रेल्वे (दुपारी 2.30 वाजता)  


​ ​

संबंधित बातम्या