गोव्याच्या कलंगुटकडे गडहिंग्लजची युनायटेड ट्रॉफी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

एकतर्फी सामने जिंकत अंतिम फेरीत पोचलेल्या गोव्याला मातब्बर संघांना अनपेक्षित धूळ चारून आलेला सिकंदराबाद कशी झुंज देणार, याची उत्कंठा होती.

गडहिंग्लज - गोव्याच्या कलंगुट असोसिएशनने सिकंदराबाद रेल्वेला 3-0 असे सहज नमवून विजेतेपदासह रोख 55 हजार रुपये आणि प्रतिष्ठेची युनायटेड ट्रॉफी पटकाविली. पुण्याचा बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) तिसऱ्या, तर चेन्नईच्या चेन्नईन्‌ एफसीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर गेले पाच दिवस ही अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा सुरू होती. अंतिम सामना पाहण्यासाठी दहा हजारांहून अधिक शौकिन उपस्थित होते. 

एकतर्फी सामने जिंकत अंतिम फेरीत पोचलेल्या गोव्याला मातब्बर संघांना अनपेक्षित धूळ चारून आलेला सिकंदराबाद कशी झुंज देणार, याची उत्कंठा होती. नगरसेवक राजेश बोरगावे यांच्या हस्ते अंतिम सामन्याचे उद्‌घाटन झाले. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला कृष्णा शिरोडकरने मारलेला जोरदार फटका गोलपोस्टला आदळला असला, तरी गोव्याचे इरादे स्पष्ट करणारा ठरला.

सिकंदराबादच्या भास्करचा प्रयत्नही लक्षवेधी ठरला. त्यामुळे सामना रंगणार, अशी चिन्हे असतानाच गोव्याच्या खेळाडूंनी चेंडूवर ताबा ठेवून सिकंदराबादच्या खेळाडूंची कोंडी केली. गोव्याच्या विनीत बुगडेने 26 व्या मिनिटाला दिलेल्या क्रॉस पासवर डार्ले डिकोस्टाने मैदानी गोल करून खाते उघडले. हेच चढाईचे धोरण कायम ठेवत गोव्याच्या चंदन गोवेकरने गोलक्षेत्राबाहेरून उत्कृष्टपणे चेंडू मारून संघाची आघाडी वाढविली. 

उत्तरार्धात सिकंदराबादने अधिक सूत्रबद्धपणे खेळ करीत गोव्याच्या आक्रमणाला लगाम घातला. सिकंदराबादचा भारत मज्जिद खान, गगन यांनी केलेली आक्रमणे गोव्याच्या दल्लेश पेडणेकर, आकाश कार्णेकर, स्वप्नील कारवालो यांनी निष्फळ ठरविली. सामना संपण्यास पाचच मिनिटे असताना संजयच्या पासवर आघाडीपटू डार्ले डिकोस्टाने आपला वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल करून सामन्याचा निकाल स्पष्ट केला. 
तत्पूर्वी, तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पुण्याने चेन्नईन्‌ एफसीचा टायब्रेकरवर 4-2 असा पराभव केला.

निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत होता. टायब्रेकरमध्ये पुण्याचा प्रेमकुमार, सिद्धांत प्रणय, ऋषभ बिस्त, भूपिंदर सिंग यांनी; तर चेन्नईनच्या शिशांक, प्रताप यांनी गोल केले. पुण्याचा गोलरक्षक अर्णाब दासने दोन फटके अडवून विजयात मोलाची भूमिका बजावली. 

आमदार हसन मुश्रीफ, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव सावटर वाझ, नगरसेवक नितीन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. यासिन नदाफ, ओंकार घुगरी, निरीक्षक राजेंद्र राऊत यांचा सत्कार झाला. रियाज शमनजी, डॉ. सतीश घाळी, सतीश पाटील, प्रवीण रेंदाळे, अनिरुद्ध रेडेकर, सिद्धार्थ बन्ने, सुनील कमते, मल्लिकार्जुन बेल्लद, सुरेश कोळकी, सुनील चौगुले, जगदीश पट्टणशेट्टी, संभाजी शिवारे, सुधाकर राणे आदी उपस्थित होते. दीपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. सुरेश दास व भूपेंद्र कोळी यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले. 

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट... 
- स्पर्धावीर........ मोयजेस डिसा (गोवा) 
- आघाडीपटू..... चंदन गोवेकर (गोवा) 
- मध्यरक्षक...... साजन (चेन्नई) 
- बचावपटू....... एस. के. प्रेम (पुणे) 
- गोलरक्षक...... एस. हेमंत (सिकंदराबाद) 
 
शिस्तबद्ध शौकिन... 
अंतिम सामना पाहण्यासाठी दहा हजारांहून अधिक शौकिन उपस्थित होते. मैदानाभोवती कोणतीही बैठक व्यवस्था नव्हती. जागा मिळेल त्या ठिकाणी उभे राहून शौकिनांनी सामन्याचा आनंद लुटला. मध्यंतरानंतर तर मैदानात प्रवेश करायलाही जागा शिल्लक नव्हती. इतक्‍या गर्दीतही उपस्थितांनी स्वयंशिस्त राखत आपण दर्दी शौकिन असल्याचे अधोरेखित केले. 
 


​ ​

संबंधित बातम्या