'द्रविड हा सचिन-गांगुलीपेक्षा भारी होता'

टीम ई-सकाळ
Tuesday, 23 June 2020

द्रविडची संपूर्ण कारकिर्दही सचिनमुळे झाकोळली गेली. तरी त्याने संघासाठी सर्वश्रेष्ठ योगदान दिले, असा उल्लेखही गंभीर यांनी केला.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडच्या योगदानाकडे दुर्लक्ष झाले, असे मत भारतीय संघाचा सलामीवीर आणि विद्यमान भाजप खासदर गौतम गंभीर यांनी व्यक्त केले. राहुल द्रविडचे योगदान हे मास्ट्रर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणेच होते. पण त्याच्याकडे आम्ही कानाडोळा केला. द्रविड दुर्लक्षित कर्णधारापैकी एक आहे, असे गंभीर यांनी म्हटले आहे.  भारतीय संघाच्या उत्तम नेतृत्वाची जेव्हा जेव्हा चर्चा होते त्यावेळी आपल्याकडे सौरव गांगुली, एमएस धोनी आणि आता कोहलीचे नाव घेतले जाते. आपण द्रविडच्या नेतृत्वाचे श्रेय देत नाही. पण द्रविड एक चांगला कर्णधार होता हे आपल्याला मान्य करावेच लागेल, असे गंभीर यांनी म्हटले आहे. द्रविडचे वैयक्तिक कामगिरी ही कमालीची आहे. मात्र त्याच्या कामगिरीसह त्याच्यातील नेतृत्वगुणाला म्हणावा तसा सन्मान मिळाला नाही. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड, वेस्ट इंडिजमध्ये जाऊन विजय नोंदवले. त्याच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण 14-15 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघावर द्रविडचाही प्रभाव होता, असे प्रामाणिकपणे वाटते, असे गंभीर यांनी एका कार्यक्रमात सांगितले. 

जर पुरुषांची स्पर्धा स्थगित झाली तर आमचीही स्पर्धा संकटात येईल : पेरी

सौरव गांगुलीने आपल्या आक्रमक शैलीमुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रभावित केले. पण द्रविडची प्रतिभा अन्य खेळाडूंपेक्षा अधिक होती. आपण त्याची तुलना सचिनसोबत करु शकतो. द्रविडची संपूर्ण कारकिर्दही सचिनमुळे झाकोळली गेली. तरी त्याने संघासाठी सर्वश्रेष्ठ योगदान दिले, असा उल्लेखही गंभीर यांनी केला.  2007 मधील टी-20 आणि 2011 मधील विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राहिलेले गंभीर पुढे म्हणाले की, द्रविडचा प्रभाव हा गांगुली आणि सचिपेक्षा अधिक वाटतो.  सौरव गांगुलीनंतर भारतीय संघाचे नेतृत्व कोणाकडे द्यावे, हा मोठा प्रश्न उभा असताना द्रविडकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज पाक संघातील तिघांना कोरोना; पुढे काय ऐकायला मिळणार?
 

त्याने 79 एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. 42 सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवला. यात सलग 14 सामने जिंकण्याचा विक्रमही द्रविडच्या नावे आहे. 2007 मध्ये मर्यादित षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अपेक्षेला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. यावेळी भारतीय संघासह राहुल द्रविडवर मोठ्याप्रमाणात टीका झाली. त्यानंतरच द्रविडने संघाचे कर्णधारपद सोडले. भारतीय संघाच्या नेतृत्वासोबतच गरजेच्या वेळी द्रविडने विकेटमागेही चोख भूमिका बजावली. 1999 ते 2004 पर्यंत त्याने 73 सामन्यात 85 फलंदाजांना बाद केले. कसोटीमध्ये प्रमुख विकेटकिपर नसतानाही सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम द्रविडच्या नावे आहे. 164 सामन्यात त्याने 210 झेल टिपले आहेत.   त्यानंतर 2016 ते 2019 पर्यंत द्रविडने  अंडर -19 आणि भारतीय अ संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. सध्याच्या घडीला राहुल द्रविड बंगळुरू स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदावर विराजमान आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या