देशासाठी दोन सुवर्ण जिंकण्याचा आनंद

गौरव नाटेकर
Sunday, 12 August 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे एरवी वैयक्तिक पातळीवर "टूर'वर एकटेच खेळणाऱ्या आम्हा टेनिसपटूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आगळी संधी मिळते. या वेळी आपल्याला पुरुष दुहेरीत दोन पदकांची संधी आहे असे वाटते. रोहन बोपण्णा-दिवीज शरण फॉर्मात आहेत. दिवीज डावखुरा आहे. त्यामुळे ही जोडी प्रतिस्पर्ध्यांसाठी आव्हान ठरेल. त्यांचा फॉर्म आणि फिटनेस महत्त्वाचा राहील.

आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे एरवी वैयक्तिक पातळीवर "टूर'वर एकटेच खेळणाऱ्या आम्हा टेनिसपटूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आगळी संधी मिळते. या वेळी आपल्याला पुरुष दुहेरीत दोन पदकांची संधी आहे असे वाटते. रोहन बोपण्णा-दिवीज शरण फॉर्मात आहेत. दिवीज डावखुरा आहे. त्यामुळे ही जोडी प्रतिस्पर्ध्यांसाठी आव्हान ठरेल. त्यांचा फॉर्म आणि फिटनेस महत्त्वाचा राहील.

सुवर्णपदकासाठी त्यांना ड्रॉ अनुकूल मिळणे काहीसे आवश्‍यक असेल. महिला एकेरीत अनुभवी अंकिता रैनाकडून आशा आहेत. नवोदितांना या स्पर्धेमुळे चांगला अनुभव मिळेल. अशा स्पर्धांत अंतिम टप्पा जवळ आल्यावर क्रीडानगरीत इतर खेळांतील देशबांधवांच्या अपेक्षा वाढतात असा माझा अनुभव आहे. 

हिरोशिमा 1994 मधील स्पर्धेपूर्वी जयपूरला डेव्हिस करंडक लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आमचा थोडक्‍यात पराभव झाला होता. त्यामुळे एशियाडमध्ये देशासाठी काही करून दाखविण्याची भावना प्रबळ होती. आम्ही आधी सांघिक स्पर्धा जिंकली. उपांत्य फेरीत मलेशिया, तर अंतिम फेरीत इंडोनेशिया यांच्याविरुद्ध आम्ही सफाईदार विजय मिळविले. त्यामुळे आमचे स्वप्न साकार झाले. हे सुवर्ण जिंकल्यानंतर क्रीडानगरीत बरेच पदाधिकारी आम्हाला भेटायला आले. 

दुहेरीत मी आणि लिअँडर पेस अशी जोडी होती. त्यामुळे मला दुहेरी सुवर्णपदकाची संधी होती. टेनिस संघावर दुसरे सुवर्ण जिंकण्याचे दडपण होते, पण आम्ही खेळावर लक्ष केंद्रित केले होते. पहिल्या दोन फेऱ्यांतील सामने चांगले झाले, पण उपांत्य फेरीत आम्ही एका मॅचपॉइंटने पिछाडीवर होतो. तो सामना खेचून आणल्यानंतर आमचा आत्मविश्‍वास आणखी उंचावला. अंतिम सामन्याच्यावेळी आपल्या पथकातील अनेक खेळाडू आले होते. त्यात हॉकी महासंघाचे तत्कालीन प्रमुख के. पी. एस. गील यांचाही समावेश होता. आमची लढत दक्षिण कोरियाच्या चॅंग इयु-जॉंग आणि किम ची-वान यांच्याशी होती. आम्ही जिद्दीने खेळून जिंकलो. त्यानंतर गील साहेबांनी स्वतः आम्हाला तिरंगा दिला. तो घेऊन आम्ही कोर्टवर "व्हिक्‍टरी लॅप' मारली. तो तिरंगा आजही माझ्या पुण्यातील कार्यालयात फ्रेम करून लावला आहे. 

जपानहून परत येण्यापूर्वी ओसाकामध्ये मला जपानमधील भारतीय राजदूतांनी आमंत्रित केले. लिअँडरला पुढील स्पर्धेसाठी जायचे होते. त्यामुळे तो येऊ शकला नाही. नंतर परतीचे विमान एअर इंडियाचे होते. त्यात पायलटने दोन वेळचा सुवर्णपदक विजेता सहप्रवासी असल्याचा उल्लेख केला. त्यानंतर अनेकांनी माझे अभिनंदन केले. हिरोशिमातील त्या स्पर्धेमुळे मला देशासाठी काही योगदान देऊ शकलो याचा विलक्षण आनंद लाभला. 
(शब्दांकन : मुकुंद पोतदार)
 

संबंधित बातम्या