विराटच्या संघाचे भविष्य बदलण्यासाठी येतोय हा प्रशिक्षक

वृत्तसंस्था
Friday, 31 August 2018

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने माजी प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांची तडकाफडकी हकालपट्टी केल्यावर आता नवीन प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. आयपीएलच्या पुढील मोसमात संघाकडून उल्लेखनीय कामगिरी होण्यासाठी प्रशिक्षकपदाची धूरा भारताला 2011चा विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या गॅरी कर्स्टन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने माजी प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांची तडकाफडकी हकालपट्टी केल्यावर आता नवीन प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. आयपीएलच्या पुढील मोसमात संघाकडून उल्लेखनीय कामगिरी होण्यासाठी प्रशिक्षकपदाची धूरा भारताला 2011चा विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या गॅरी कर्स्टन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

न्यूझीलंडचे माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी यांनी गेली आठ वर्ष आरसीबी संघासोबत खेळाडू आणि प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका पार पाडली. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. त्यांना गुणतक्यात शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 
विराट कोहली, युझवेंद्र चहल, उमेश यादव, मोईन अली, ए बी डिव्हिलर्स, महंम्मद सिराज यांच्या सारखे एकापेक्षा एक सरस खेळाडू असूनही आरसीबी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर अपयशी ठरला होता. त्यामुळेच नुकतेच संघ व्यवस्थापनाकडून डॅनिअल व्हिटोरी, फलंदाजीचे प्रशिक्षक ट्रेंट वूडहिल आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अॅंड्य्रू मॅक्डॉनल्ड यांची हकालपट्टी करण्यात आली. भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहरा हा आरसीबीचा गोलंदाजीचा प्रशिक्षक आहे. त्याचे संघातील स्थान मात्र कायम राहिले आहे. 

 

या निर्णयामुळे विराट कोहलीने आपल्या मर्जीतील माणसांचे संघातील स्थान कायम ठेवत बाकीच्यांना डच्चू दिल्याचे चित्र निर्माण झाले होते. कर्स्टन यांनी गेल्या मोसमात बंगळूरुच्या फलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. याबद्दल काहीही वक्तव्य न करता व्हिटोरीने संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, ''बंगळूरुसोबतचा आठ वर्षांचा प्रवास अविस्मरणीय होता. संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.''

प्रशिक्षकपदी निवडी झाल्यावर कर्स्टन म्हणाले, ''व्हिटोरीच्या मार्गदर्शनाखाली मी मागील सत्रात फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पाहिली. व्हिटोरीकडून बरेच काही शिकायला मिळाले. बंगळूरुसोबतच्या पुढचा प्रवास अनुभवण्यासाठी मी आतुर आहे. माझ्या क्षमतेनुसार संघाला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल.'' 


​ ​

संबंधित बातम्या