Friendship Day Special : सीमारेषेपलीकडील मैत्रीचा गोडवा!

टीम ई-सकाळ
Sunday, 2 August 2020

क्रिकेटमध्ये असे कितीतरी खेळाडू आहेत जे सुरवातीला मैदानावर भिडले अन् मैदानाबाहेर त्यांच्यात सलोख्याचे संबंध असल्याचे दिसून येते.

क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांविरुद्ध भिडणाऱ्या खेळाडूंचा मैदानाबाहेरील मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. क्रिकेटमध्ये असे कितीतरी खेळाडू आहेत जे सुरवातीला मैदानावर भिडले अन् मैदानाबाहेर त्यांच्यात सलोख्याचे संबंध असल्याचे दिसून येते. निवृत्तीनंतर क्रिकेटपासून दूर झाले असले तरी, आज सुद्धा काही खेळाडूंच्यातील मैत्री टिकून आहे. मैदानावर गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातील द्वंद्व नेहमीच पाहायला मिळते. त्यातल्या त्यात उत्तम फलंदाज आणि चांगला गोलंदाज यांच्यातील एकप्रकारचे युद्ध पाहण्यासाठी क्रिकेटचे चाहते आवर्जून  सामन्यांची वाट पाहत असतात. मग उदाहरण द्यायचेच झाल्यास, वेस्ट इंडीज संघाचे महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स आणि पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम असो, किंवा ऑस्ट्रेलियन संघाचा गोलंदाज ब्रेट ली आणि भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकर. हे खेळाडू मैदानावर नेहमीच एकमेकांविरुद्ध भिडल्याचे आपण पाहिले. पण मैदानाच्या बाहेर चांगले मित्र असल्याचे वारंवार निदर्शनास आले. त्यामुळे मैत्री दिनाच्या या दिवशी अशा दोन खेळाडूंची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, जे मैदानावर एकमेकांविरुद्ध लढले आणि मैदानाबाहेर चांगले मित्र राहिले आहेत.   

आशियायी स्तरावर स्पर्धा करण्यासाठी फुटबॉलच्या स्थानिक विकासावर लक्ष देण्याची गरज - भूटिया  

भारत आणि पाकिस्तान या दोन संघांची मैदानावरील टक्कर पाहण्यासाठी जगभरात अनेकजण उत्सुक असतात. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या दरम्यान दोन्ही संघातील खेळाडू देखील एकमेकांविरुद्ध अधिक जोशाने मैदानावर उतरल्याचे नेहमी पाहायला मिळते. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर होणारे वाद या सामन्याच्या वेळेस देखील अनेकदा झाल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. परंतु भारतीय संघाचा खेळाडू आणि पाकिस्तानचा खेळाडू यांच्यातील मैदानाबाहेर असलेली घट्ट मैत्री फार कमी  लोकांना माहित असेल. ते खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आणि वसीम अक्रम. सचिन व वसीम अक्रम ज्याप्रमाणे मैदानावर एकमेकांविरुद्ध भिडले, त्याच्या नेमके उलट मैदानाबाहेर हे दोनही खेळाडू भेटत राहिले आहेत. 2019 च्या इंग्लंड मधील वर्ल्डकप सामन्यांच्या अगोदर एका कार्यक्रमात, वसीम अक्रमने सचिन तेंडुलकरने केलेल्या पाहुणचाराची चांगलीच प्रशंसा केली होती. सचिन तेंडुलकर फलंदाजीसोबतच एक चांगला खवय्या असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. नॉन-व्हेज डिशेस या नेहमीच सचिनच्या आवडीच्या राहिल्या आहेत. वसीम अक्रमने देखील या कार्यक्रमात याचाच दाखला देत, सचिनच्या घरी बोलावून केलेल्या पाहुणचाराचे किस्से सांगितले होते.    

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

याशिवाय, सचिन तेंडुलकर आणि वसीम अक्रम हे मैदानावर प्रतिस्पर्धी म्हणून जितक्या आवेशाने भिडले, तितकेच त्यांची केमिस्ट्री मैदानाबाहेर देखील मैत्रीच्या रूपाने जुळली. मात्र हे दोन्ही खेळाडू जेंव्हा सर्वप्रथम समोरासमोर आले त्याचा असाच किस्सा वसीम अक्रमने अजून एका कार्यक्रमात सांगितला होता. 1989 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतून सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. त्यावेळी वसीम अक्रमने आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर क्रिकेट जगतात एकच दहशत निर्माण केली होती.  सचिनच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीच पाकिस्तानच्या संघात सचिनबद्दल चर्चा झाली होती.  वयाच्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सचिनची निवड कशी झाली? असा प्रश्न आमच्या समोर पडल्याचा निर्वाळा वसीम अक्रमने केला होता. याशिवाय सचिन जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा त्याला चिथावण्याचा प्रयत्न केल्याचे देखील वसीम अक्रमने कबुल केले होते.  सचिनला चिथावण्यासाठी गोलंदाजीसोबतच शब्दांचा मारा देखील केल्याचे वसीम अक्रमने सांगितले. पण सचिनने यास कोणताही प्रतिसाद न देता आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले होते. त्याच्या याच गुणधर्मामुळे पुढे जाऊन सचिन मोठा खेळाडू होईल असे जाणवल्याचे वसीम अक्रमने सांगितले. कारण उत्तम फलंदाजी करणारे खेळाडू कधीच गोलंदाजाच्या चिथावणीवर लक्ष देत नाहीत आणि सचिनने नेमके तेच केल्याचे वसीम अक्रम म्हणाला. दरम्यान, सचिन तेंडुलकरने आपल्या पदार्पणातील पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 24 चेंडूत 15 धावा केल्या होत्या.


​ ​

संबंधित बातम्या