अमेरिकन ओपनलाही सेक्सिजमची वाळवी..

हर्षदा कोतवाल
Saturday, 8 September 2018

सोशल मीडियावर सर्वत्र टिका झाल्यावर तिला केलेला दंड मागे घेण्यात आला. तसेच USTAकडून तिची माफीही मागण्यात आली. USTAने सर्व महिला आणि पुरुष खेळाडूंना मैदानातील खुर्चीतच शर्ट बदलता येईल, हा नियमही स्पष्ट केला. 

जगभरात फार पूर्वीपासून महिला आणि पुरुष यांच्यात निर्सगत: असलेल्या वेगळेपणाची ढाल करत महिलांना आजवर जाणूनबुजून क्रीडा क्षेत्रापासून लांब ठेवण्याचे प्रयत्न केले गेले. महिलांना पुरुषांची बरोबरी करताच येणार नाही तर त्या क्रीडा क्षेत्रात सहभागीच का होतात? असंही मत मांडलं गेलं. आज क्रीडा क्षेत्रात पुरुषांपेक्षाही सरस कामगिरी करणाऱ्या महिला असूनही पुरुषी मानसिकतेत काडीमात्र बदल झालेला नाही आणि त्यामुळेच आजही या क्षेत्रात सर्रास लैंगिक भेदभाव केला जाते. 

महिलांना लैंगिक छळ हा काही नवीन नाही, मग तो चार भिंतींच्या आत असो किंवा बाहेर. महिला खेळाडूंचा पोषाख आणि त्यांची मोठी स्वप्न यांमुळे त्यांना नेहमीच लैंगिक छळाला सामोरे जावे लागले आहे. कोणाताही खेळ खेळण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा पोषाख करावा लागतो. याच पोषाखामुळे आपल्यावर स्थिरावलेल्या नजरा या अनेक महिला खेळाडूंची रोजची अडचण आहे. 

भारतासारख्या सांस्कृतिक गुलामगिरीत अडकलेल्या देशात अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत मात्र स्त्री आणि पुरुष दोघांनाही कायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या समान वागणूक असणाऱ्या अमेरिकेतही महिलांना लैंगिक छळाचा बळी बनावे लागत आहे. 

सध्या न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा सुरु आहेत. न्यूयॉर्कमध्ये सध्या प्रचंड उकाडा आहे. तसेच दमट हवामानामुळे खेळाडू लगेचच घामाघूम होतात. त्यामुळेच प्रत्येक सामन्यात पुरुष खेळाडू आपल्याला कोर्टवर एकामागोमाग एक शर्ट बदलताना दिसतात. असाच एक प्रसंग अमेरिकन ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील एका सामन्यात घडला. फरक फक्त एवढाच, इथे पुरुष खेळाडू ऐवजी महिला खेळाडूने मैदानावर शर्ट बदलला.

अमेरिकन स्पर्धेत फ्रेंचची टेनिसपटू अलिझे कॉर्नेट हिने उलटा घातलेला शर्ट सामना सुरु असताना फक्त सरळ करुन घातला. हे सर्व करताना तिचे अंतर्वस्त्र निदर्शनास आले. (फक्त अंतर्वस्त्र घालून रस्त्यावर फिरणाऱ्या महिलांना पाश्चिमात्य देशात कोणी काहीही बोलत नाही. मात्र, मैदानावर तिचे अंतर्वस्त्र दिसणे 'आक्षेपार्ह' होते.) तिला जेव्हा आपण भरमैदानात केलेली 'चूक' ध्यानात आली तेव्हा ती मैदानाच्या मागच्या बाजूला गेली आणि नीट शर्ट घालून आली. मात्र या सर्वांत तिने नियामांचा भंग केल्याचा आरोप सामन्याचे पंच ख्रिस्तियन रॅस्क यांनी केला आणि त्यासाठी तिला दंडही ठोठावण्यात आला. 

पंचांनी दिलेल्या या निर्णयावरुन सोशल मीडियावर चांगलेच वादळ उठले. टेनिसमध्ये नेहमीच आपण पुरुष खेळाडूंना मैदानावरच शर्ट बदलताना पाहत आलो आहे. अमेरिकन ओपनमध्ये खेळताना उन्हाचा प्रचंड त्रास होत असल्याने बरेच खेळाडू मैदानावरच शर्ट काढून अंगावर टॉवेल घेऊन बसतात. त्यांना पंचांकडून कोणत्याही प्रकारचा दंड केला जात नाही. 
याच धरतीवर सोशल मीडियावर पंच रॅस्क यांच्यावर प्रतिगामी विचारसणीचे असल्याची टीका केली गेली. 

या सर्व प्रकाराबद्दल बोलताना कॉर्नेट म्हणाली, ''नक्कीच महिलांना पुरुषांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते आणि टेनिसमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.'' अमेरिकन टेनिस महासंघाने (USTA) याबद्दल माफी मागितल्यावर तिने ती स्वीकारली मात्र, तिने फ्रेंच टेनिस महासंघावर टीका केली. फ्रेंच टेनिस महासंघाने फ्रेंच ओपन स्पर्धेसाठी ड्रेसकोड ठरवला आहे, ज्यामुळे अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना व्हिलियम्स हिला आपला नेहमीचा कॅटसूट घालण्यावर बंधने येणार आहेत. फ्रेंच टेनिस महासंघाचे अध्यक्ष बेरनर्ड ग्युडीसेली यांनी सेरेनाला खेळाचा आणि जागेचा मान राखण्याचा 'सल्ला' दिला होता. कॉर्नेट म्हणाली, ''ही सर्व माणसे एकाच दिशेने जात आहेत. एवढ्या पुढारलेल्या जगातही माझ्या अध्यक्षांसारखी काही माणसे असतात जी दुसऱ्याच जगात वावरत असतात.''

सोशल मीडियावर सर्वत्र टिका झाल्यावर तिला केलेला दंड मागे घेण्यात आला. तसेच USTAकडून तिची माफीही मागण्यात आली. USTAने सर्व महिला आणि पुरुष खेळाडूंना मैदानातील खुर्चीतच शर्ट बदलता येईल, हा नियमही स्पष्ट केला. 

ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पुरुष यांनी महिलांना समान वेतन दिले जाते. परंतू, महिलांना समान वागणूक मिळणे हे जास्त महत्त्वाचे आहे. या प्रसंगावरुन जगातील पुरुषी मानसिकता अजून बदलेली नसून सर्व महिलांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट होते. नंतर माफी मागून महिलांच्या अस्तित्वावर उभे केलेले प्रश्नचिन्ह पुसले जाऊ शकत नाही. महिलेला 'स्त्री' म्हणून वेगळी वागणूक देण्यापेक्षा माणूस म्हणूनच तिच्याकडे पाहणे जास्त महत्त्वाचं आहे.


​ ​

संबंधित बातम्या