जैागतिक मैदानी स्पर्धा : दोन वर्षाच्या मुलाची माता ठरली वेगवान

नरेश शेळके
Monday, 30 September 2019

पॉकेट रॉकेट` या टोपणनावाने परिचीत असलेल्या 32 वर्षीय जमैकाच्या शेली अॅन फ्रेझर-प्रिसेने मुलगा झियॉनला दोन वर्षापूर्वी जन्म दिल्यानंतर येथील खलिफा स्टेडियमवर जागतिक मैदानी स्पर्धेत महिलांची शंभर मीटर शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा किताब मिळविला.

दोहा : `पॉकेट रॉकेट` या टोपणनावाने परिचीत असलेल्या 32 वर्षीय जमैकाच्या शेली अॅन फ्रेझर-प्रिसेने मुलगा झियॉनला दोन वर्षापूर्वी जन्म दिल्यानंतर येथील खलिफा स्टेडियमवर जागतिक मैदानी स्पर्धेत महिलांची शंभर मीटर शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा किताब मिळविला. हे तिचे शंभर मीटर शर्यतीतील चौथे विश्वविजेतेपद होय. पुरुषांच्या शर्यतीत योहान ब्लेकला पदक जिंकता न आल्याने निराश झालेल्या जमैकाच्या प्रेक्षकांनी शेलीच्या विजयानंतर स्टेडियममध्ये प्रचंड जल्लोश केला.

शेलीप्रमाणेच पुरुषांच्या तिहेरी उडीत अमेरिकेच्या ख्रिस्तीयन टेलरने आपले चौथे विश्वविजेतेपद मिळविले. मिश्र रिलेत भारताला अखेर सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या शर्यतीप्रमाणेच महिलांच्या शंभर मीटर शर्यतीपूर्वी `लाईट अँड साऊंड शो` द्वारे खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. सर्वांच्या नजरा शेली आणि तिची सहकारी एलेन थॉम्पसनवर होत्या. पिवळ्या रंगाचा विग घातलेल्या शेलीने सहाव्या लेनमधून प्रारंभ केला आणि मागे वळून पाहिलेच नाही. तिचा प्रारंभ इतरांच्या तुलनेत संथ होता. मात्र, नंतर तिने भन्नाट वेग घेतला आणि नवीन इतिहास घडविला.

युरोपियन विजेती डायना अशर स्मिथ रौप्य तर गतस्पर्धेतील रौप्यपदक विजेती मेरी जोस टा लू ब्राँझपदकाची मानकरी ठरली. रिओ आॉलिंपीक विजेत्या एलेन थॉम्पसनला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यात तीन जमैकन धावपटू होत्या. एकमेव अमेरिकन धावपटू टेहना डॅनियल्सला शेवटचा म्हणजे सातवा क्रमांक मिळाला. कारण नेदरलँडच्या डाफने शिफर्सने दुखापतीमुळे भाग घेतला नाही. गतविजेती अमेरिकेची टोरी बोवी हिने उपांत्यफेरीतूनच माघार घेतली होती.

वयाच्या 32 व्या वर्षी मुलाला कडेवर घेऊन येथे उभी आहे, स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. मुलाला जन्मदिल्यानंतर पुनरागमनाबाबत अनेकांना शंका होती. मात्र, मुलगा आणि पती हे माझी ताकद आहे. त्यांच्यामुळेच मी येथे जिंकू शकले` शेली अॅन फ्रेझर
-प्रिसे, सुवर्णपदक विजेती

अमेरिकेचा विश्वविक्रम जागतिक मैदानी स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या 4-400 मिश्र रिलेत अमेरिका संघाने सलग दुसऱ्या दिवशी विश्वविक्रमाची नोंद केली. विल्बर्ट लंडन, अॅलीसन फेलीक्स, कर्टनी ओकोलो आणि मिचेल चेरीचा अमेरिका संघात समावेश होता. भारताने सातवे स्थान मिळवून अखेर टोकीयोसाठीचे आपले तिकीट पक्के केले. महम्मद अनसने भन्नाट प्रारंभ करून दिल्यानंतर व्ही. के. विस्मया संथ होती. तिसऱ्या क्रमांकावरील जिस्ना मॅथ्यू गडबडल्याने पहिल्या पाचमध्ये येण्याची भारताची संधी हुकली. कारण जिस्नाने निर्मल तोमकडे बॅटन दिले त्यावेळी भारतीय संघ शेवटच्या क्रमांकावर होता.

हिमा दासच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली असली तरी ती असती तर नक्कीच भारताने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले असते अशी भावना भारतीय प्रशिक्षकांनी व्यक्त केली.

निकाल : (पुरुष) - तिहेरी उडी - ख्रिस्तीयन टेलर (अमेरिका-17.92 मीटर), विल क्ले (अमेरिका-17.74 मीटर), ह्युजेस झँगो (बुर्कीनो फासो-17.66 मीटर). महिला - पोल व्हॉल्ट - अन्झेलिका सिदोरोवा (अधिकृत तटस्थ अॅथलिट-4.95 मीटर), सँडी मॉरीस (अमेरिका-4.90 मीटर), कँटरीना स्टेफिनिदी (ग्रीस-4.85 मीटर). 100 मीटर - शेली अॅन फ्रेझर प्रिसे (जमैका-10.71 सेकंद), डायना अशर स्मिथ (ग्रेट ब्रिटन - 10.83 सेकंद), मेरी जोस टा लू (आयव्हरी कौस्ट-10.90 सेकंद). मिश्र रिले - अमेरिका (3मि.09.34 सेकंद-विश्वविक्रम), जमैका (3 मि.11.78 सेकंद), बहरीन (3 मि.11.82 सेकंद).

 

-महिला शंभर मीटरमध्ये जमैकाचे एकूण पाचवे सुवर्ण
-2001 च्या स्पर्धेनंतर प्रथमच अमेरिकेला पदक नाही.
-डायनामुळे ग्रेट ब्रिटनला प्रथमच पदक
-20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत प्रथम तिन्ही पदके चीनला, असे प्रथमच घडले.
-अमेरिकेच्या मिश्र रिले सुवर्णपदकामुळे अॅलीसन फेलीक्सला विक्रमी 12 वे सुवर्ण.


​ ​

संबंधित बातम्या