'रेड लाइट' परिसरात फेरफटका; 4 बास्केटबॉलपटूंची हकालपट्टी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 August 2018

यापूर्वीच्या घटना 
-2014 ः आशियाई स्पर्धेतील महिला स्वयंसेविकेस उद्देशून अश्‍लील शब्द वापरल्याने इराणच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी. 
-2014 ः क्रीडा ग्राममधील महिला कर्मचाऱ्याकडे अश्‍लील भावनेने बघितल्यामुळे पॅलेस्टाईन फुटबॉलपटूवर कारवाई. 
-2017 ः राष्ट्रकुल स्पर्धेत फोटो शूट दरम्यान महिला खेळाडूशी अश्‍लील चाळे केल्याचा ऑस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप. 

जाकार्ता : संघ शिस्त मोडून साखळी सामन्यातील विजयानंतर जल्लोषाच्या भरात "रेड लाइट'चा फेरफटका मारणाऱ्या आणि वेश्‍यांवर पैसे उधळणाऱ्या जपानच्या चार बास्केटबॉलपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेतून मायदेशात हाकलून देण्यात आले आहे. जपान संघ व्यवस्थापनाने सोमवारी ही कारवाई केली. 

स्पर्धेच्या अधिकृत उद्‌घाटन सोहळ्यापूर्वीच बास्केटबॉल सामन्यांना सुरवात झाली. गेल्या आठवड्यात गुरुवारी साखळी सामन्यात कतारविरुद्ध 82-71 असा विजय मिळविल्यानंतर जपानचे चार बास्केटबॉलपटू क्रीडा ग्राममधून बाहेर पडले, ते थेट "रेड लाइट' परिसरातच फिरायला गेले. जपानमधीलच एका दैनिकाच्या पत्रकाराने ही घटना उघडकीस आणली. हे चारही खेळाडू जपानच्या अधिकृत जर्सी परिधानकरूनच फिरायला गेले होते. या खेळाडूंची कृती ही जपानची प्रतिमा डागाळणारी असल्याचे कारण देत चौघांनाही तातडीने जपानला रवाना होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चार खेळाडूंमध्ये युया नागायोशी, ताकुया हाशिमोटो, ताकुमा साटो आणि केईटा इमामुरा यांचा समावेश आहे. या चारही खेळाडूंवर अधिक कडक कारवाई करण्याचे संकेत जपान बास्केटबॉल महासंघाने दिले आहेत. 

जपान पथकाचे प्रमुख याशुहिरो यामाशिता यांनी झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला असून, देशवासीय आणि स्पर्धा संयोजकांची माफी मागितली आहे. यामाशिता म्हणाले, "ही गोष्ट निश्‍चितच लाजिरवाणी आहे. आम्ही देशवासीय आणि संयोजकांची माफी मागतो. अशा घटना इथून पुढे होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.'' 

अन्य खेळाडूंना इशारा 
याद राखा, असे काही कराल तर गय केली जाणार नाही, अशा शब्दांत आशियाई ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष शेख अहमद अल फहाद अल साबा यांनी इंडोनेशियात आलेल्या अन्य देशाच्या खेळाडूंना इशारा दिला. ते म्हणाले, "प्रत्येक स्पर्धेत अशा घटना घडतात हे दुर्दैवी आहे. खेळाडूंकडे उद्याची पिढी आदर्श म्हणून बघत असते. तुम्ही देशाचे प्रतिनिधीत्व करताना केवळ पदकाच्या शर्यतीत नसता, तर तुमच्या वर्तनातून देशाची प्रतिमादेखील ठरत असते. याचे भान खेळाडूंनी ठेवावे. जपानने केलेली कारवाई स्वागतार्ह असून, त्याचा अन्य देशांनी आदर्श घ्यावा.'' 

यापूर्वीच्या घटना 
-2014 ः आशियाई स्पर्धेतील महिला स्वयंसेविकेस उद्देशून अश्‍लील शब्द वापरल्याने इराणच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी. 
-2014 ः क्रीडा ग्राममधील महिला कर्मचाऱ्याकडे अश्‍लील भावनेने बघितल्यामुळे पॅलेस्टाईन फुटबॉलपटूवर कारवाई. 
-2017 ः राष्ट्रकुल स्पर्धेत फोटो शूट दरम्यान महिला खेळाडूशी अश्‍लील चाळे केल्याचा ऑस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप. 

संबंधित बातम्या