श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूकडून सौरव गांगुलीचे तोंडभर कौतूक

शैलेश नागवेकर
Sunday, 26 July 2020

क्रिकेट प्रशासक म्हणून सौरव गांगुलीकडे आता मोठा अनुभव आहे. त्याच्याकडे क्रिकेट विचाराची तल्लख बुद्धी आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती आहे.

नवी दिल्ली : क्रिकेट प्रशासक म्हणून सौरव गांगुलीकडे आता मोठा अनुभव आहे. त्याच्याकडे क्रिकेट विचाराची तल्लख बुद्धी आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती आहे, असे सांगत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने गांगुलीला उघड पाठींबा दर्शवला आहे.

सौरव गांगुलीची विचारशक्ती व्यापक आहे. एवढ्या मोठ्या पदावर असताना तो पक्षपात करणार नाही. क्रिकेट मध्ये चांगले बदल घडवण्याची गांगुलीकडे क्षमता आहे. तसेच एक क्रिकेट खेळाडू म्हणून तो श्रेष्ठ होताच पण त्याच्या तल्लख बुद्धीमळे मी त्याचा फॅन आहे, अशा शब्दात संगकाराने गांगुलीचे कौतूक केले. आयसीसीला क्रिकेटचे नियम तयार करून देणाऱ्या मेरिलबोर्न क्रिकेट क्लबचे संगकारा (एमससीसी) अध्यक्ष आहे.

आयसीसीचे प्रमुखपद असताना तुम्ही बीसीसीआय, ईसीबी किंवा श्रीलंका क्रिकेट मंडळ यांचा विचार करू शकत नाही. तर तुम्हाला सर्वांसाठी क्रिकेटच्या हीताचा विचार करायचा असतो. आणि गांगुलीकडे असा विचार करण्याची क्षमता आहे. इतकेच नव्हे तर नाती संबंध वाढवण्याचीही कला गांगुलीकडे अंतर्भूत आहे, असे संगकारा म्हणतो.

बीसीसीसीआयचा अध्यक्ष होण्याअगोदरपासून मी गांगुलीचे हे गुण अनुभवलेले आहे. एमसीसी क्रिकेट समितीचा सदस्य असताना तो जगभरातील खेळाडू - प्रशासकांसह नाते- संबंध कसे वाढवत होता हे मी त्या समितीचा सदस्य असताना पाहिलेले आहे. त्यामुळे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली हा योग्य व्यक्ती असल्याचे मत कुमार संगकाराने व्यक्त केले आहे. शशांक मनोहर हे आयसीसीच्या कार्याध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर आयसीसीने पुढच्या निवडणूकीसाठी अजून प्रक्रिया सुरू केलेली नाही.       


​ ​

संबंधित बातम्या