इंझमामच म्हणतोय, पाकिस्तानी खेळाडूंमध्येच दम नाही...  

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 15 August 2020

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने पाकिस्तानच्या फलंदाजांना फटकारले आहे.

इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरवार पासून साऊथॅम्प्टन येथील रोझ बाऊल येथे सुरु झाला. या सामन्या अगोदर मँचेस्टर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाला हार पत्करावी लागली होती. या सामन्यात पाकिस्तानला मजबूत स्थितीतून देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंनी संघाच्या कामगिरीवर टीका केली होती. त्यानंतर आता पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने पाकिस्तानच्या फलंदाजांना फटकारले आहे. इंझमाम-उल-हकने सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेत फलंदाज इंग्लंडविरुद्ध अधिक बचावात्मक खेळी करत असल्याचे म्हटले आहे. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...    

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज इंझमाम-उल-हकने सोशल मीडियाच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना, पाकिस्तान संघाचे फलंदाज सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत घाबरत असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि आत्ता साऊथॅम्प्टन येथे सुरु असलेल्या कसोटी मध्ये पाकिस्तानचे खेळाडू फलंदाजी करताना आपले शॉट्स खेळण्यास घाबरले होते, असे इंझमाम-उल-हकने सांगितले. तसेच या दोन्ही सामन्यांच्या दरम्यान पाकिस्तानचे फलंदाज ज्याप्रमाणे बाद झाले, त्यावेळेस त्यांची बॅट पायाच्या मागे असल्याचे इंझमाम-उल-हकने म्हटले आहे. तर फलंदाजी करताना, फटके खेळण्यासाठी बॅट आपल्या पायाच्या पुढे असणे गरजेचे असल्याचे सांगत, इंझमाम-उल-हकने फलंदाजांचा बचावात्मक दृष्टिकोनातून मैदानावर उतरण्यामुळे ते स्लिप्समध्ये झेलबाद होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

शिवाय, या व पुढील अंतिम कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला दमदार कामगिरी करत, इंग्लंडला हरवण्यासाठी फलंदाज आणि संघ व्यवस्थापनाला आक्रमक क्रिकेट खेळण्याची गरज असल्याचे इंझमाम-उल-हकने सांगितले. अन्यथा सध्या चालू असलेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला पराभवापासून वाचवण्यासाठी पावसावर अवलंबून राहावे लागणार असल्याचे इंझमाम-उल-हकने म्हटले आहे.     

इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 126 धावा केल्या. पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे 45.4 षटकांचाच झाला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल देखील पावसाने पुन्हा व्यत्यय आणल्यामुळे 40.2 षटके खेळली गेली. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने पाकिस्तानला 9 बाद 223 धावांवर रोखले. सध्या यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने नाबाद 60 धावांवर खेळत आहे. तर नसीम शाह 1 धावांवर क्रिझवर आहे. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

दरम्यान, यापूर्वी ओल्ड ट्रॅफर्ड येथील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने तीन गडी राखत पाकिस्तान संघावर विजय मिळवला होता. त्यामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 0 - 1 अशी आघाडी मिळवली होती.             


​ ​

संबंधित बातम्या