विराट, शास्त्री टीकेचे धनी; माजी खेळाडूंकडून जोरदार 'फटकेबाजी' 

वृत्तसंस्था
Tuesday, 4 September 2018

हरभजनकडून अश्‍विन लक्ष्य 
भारत-इंग्लंड मालिकेत समालोचन करत असलेला माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगने भारतीय संघाच्या अपयशास अश्‍विनला जबाबदार धरले. संघाला गरज असताना अश्‍विन विकेट मिळवण्यास अपयशी ठरत असल्याचे हरभजनने म्हटले आहे. केवळ एका ठरावीक ठिकाणी चेंडू टाकायचा होता, उर्वरित काम चेंडू करत होता; पण अश्‍विनला हा टप्पा पकडता आला नाही, असेही हरभजन म्हणाला. 

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसह भारताने मालिका गमावल्यावर माजी खेळाडूंनी कर्णधार म्हणून विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरवात केली आहे. माजी कर्णधार सौरभ गांगुलीने, तर शास्त्री आणि फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांना भारताच्या खराब कामगिरीसाठी जबाबदार धरावे, असे स्पष्ट मत मांडले आहे. 

माजी कर्णधार आणि विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी कोहलीच्या नेतृत्वावरच प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. कोहली मैदानावर नेतृत्व करत असताना उपकर्णधार किंवा इतर सीनियर खेळाडूंशी चर्चा करत नाही, स्वतःच स्वतःचे निर्णय घेतो असे त्यांचे म्हणणे आहे. विराटच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करताना गावसकर यांनी त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले. 

मालिकेतला एक सामना शिल्लक असतानाही विराटने 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. एखाद्या मालिकेत कर्णधाराला एवढ्या धावा क्वचितच करता आलेल्या आहेत. तरीही भारताने मालिका गमावली. वैयक्तिक फलंदाज म्हणून त्याने जबरदस्त कामगिरी केली असली, तरी त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळालेली नाही, असे गावसकर यांनी म्हटले आहे. 

हरभजनकडून अश्‍विन लक्ष्य 
भारत-इंग्लंड मालिकेत समालोचन करत असलेला माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगने भारतीय संघाच्या अपयशास अश्‍विनला जबाबदार धरले. संघाला गरज असताना अश्‍विन विकेट मिळवण्यास अपयशी ठरत असल्याचे हरभजनने म्हटले आहे. केवळ एका ठरावीक ठिकाणी चेंडू टाकायचा होता, उर्वरित काम चेंडू करत होता; पण अश्‍विनला हा टप्पा पकडता आला नाही, असेही हरभजन म्हणाला. 

अझहरचा सपोर्ट स्टाफवर निशाना 
माजी कर्णधार अझहरुद्दीनने भारतीय संघाच्या अपयशाबद्दल सपोर्ट स्टाफवर निशाना साधला. इंग्लिश वातावरणात खेळण्यासाठी आपल्या संघाची योग्य तयारी करण्यात सपोर्ट स्टाफ (मुख्य प्रशिक्षकांसह सर्व प्रशिक्षक) अपयशी ठरल्याचे अझहरने सांगितले. त्याचवेळी स्विंग होणारे चेंडू खेळण्यासाठी आपल्या फलंदाजीचे तंत्र चुकीचे होते आणि विराट कोहलीवर पूर्णतः अवलंबून राहिलो. शिखर धवन आणि केएल राहुल या सलामीवीरांनीही निराशा केली. चेतेश्‍वर पुजारा पहिल्या डावात शतक करत असताना आपल्याला किमान शतकी आघाडी मिळायला हवी होती, असे मत अझहरने व्यक्त केले. 

गांगुलीची शास्त्रीवर तोफ 
भारतीय संघाच्या अपयशास संघ व्यवस्थापन जबाबदार असून, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांना दोषी धरले पाहिजे; त्यात सर्वाधिक जबाबदारी शास्त्री यांची असल्याची तोफ सौरव गांगुलीने डागली. शास्त्रींसह बांगर यांनी उत्तरदायित्व घ्यावे, असेही गांगुलीने म्हटले आहे. 

परदेशात सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ मैदानावरील कामगिरीने ओळखला जातो. ड्रेसिंगरूममध्ये बसून ज्ञान पाजळून असा संघ तयार होत नाही. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे; परंतु जोपर्यंत बॅट बोलत नाही, तोपर्यंत परदेशात सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ तयार होत नाही. 
- वीरेंद्र सेहवाग, माजी सलामीवीर 


​ ​

संबंधित बातम्या