मेस्सी, रोनाल्डो, मॅराडोना, पेले एकाच संघात 

संजय घारपुरे
Tuesday, 15 December 2020

लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो हे एकाच संघातील असतील तर... त्यांच्या साथीला दिएगो मॅराडोना, पेले यांचाही समावेश असेल तर...

पॅरिस : लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो हे एकाच संघातील असतील तर... त्यांच्या साथीला दिएगो मॅराडोना, पेले यांचाही समावेश असेल तर... फुटबॉलमधील बॅलॉन डी ओर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देणाऱ्या मासिकाने सार्वकालीक सर्वोत्तम संघ निवडला आहे, त्यात या दिग्गज खेळाडूंना स्थान आहे. 

इंग्लिश प्रीमिअर लीग : जेम्स मॅडिसनच्या सलग दोन गोलमुळे लिसेस्टर सिटी विजयी   

जगातील 140 पत्रकारांनी सर्वोत्तम फुटबॉलपटूंचे तीन संघ निवडले आहेत. त्यातील अव्वल संघाचे स्वरूप 3-4-3 आहे. त्यात रोनाल्डो नाझारिओ हे मध्य स्ट्राईकर आहेत. त्यांच्या बाजूला लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो असतील. मेस्सीने बार्सिलोनाकडून खेळताना 746 लढतीत 642 गोल केले आहेत, तर ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदकडून खेळताना 450 गोल केले आहेत. रोनाल्डो नाझारिओ हे बार्सिलोना तसेच रेयाल माद्रिदकडून खेळले आहेत. त्यांनी एकंदर 151 वेळा चेंडू गोलजाळ्यात धाडला होता. 

शंभराव्या सामन्यात रोनाल्डोचे दोन गोल

या संघात पेले आणि मॅराडोना हे आक्रमक मध्यरक्षक म्हणून असतील. झॅवी फर्नांडिस आणि लोथर मथायस बचावात्मक मध्यरक्षक असतील. बचावफळीची मदार फ्रॅंझ बेकनबॉर, पाओलो माल्दीनी आणि कॅफू यांच्यावर असेल. आश्‍चर्य म्हणजे गोलरक्षकासाठी गिआनलुईगी बफन आणि मॅन्यूएल नेऊर यांच्याऐवजी रशियाचे लेव याशिन यांना पसंती लाभली आहे. फ्रान्स फुटबॉलच बॅलॉन डी ओर या प्रतिष्ठित मासिकाचे प्रकाशन करीत असते. 

सार्वकालिक स्वप्नवत सर्वोत्तम संघातील निवड हा माझा बहुमान आहे. मला पसंती देणाऱ्या सर्वांचा आभारी आहे; तसेच या संघात निवड झालेल्या तसेच त्यासाठी नामांकन मिळालेल्या सर्वांचे अभिनदन! या सर्वांची कामगिरी जबरदस्त आहे. 
- लिओनेल मेस्सी 

फ्रान्स फुटबॉलच्या सर्वोत्तम संघात निवड होणे हा एक सन्मान आहे. निवडलेले संघ काय जबरदस्त आहेत. या संघातील प्रत्येक खेळाडू आदरास आणि कौतुकास पात्र आहे. त्यांच्यासोबत मी आहे, याचा मला अभिमान आहे. 
- ख्रिस्तियानो रोनाल्डो 


​ ​

संबंधित बातम्या