२१ पेनल्टी किकच्या चकमकीनंतर विलारेलचा विजय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 May 2021

युरोपा फुटबॉल लीगच्या अंतिम सामन्यात इतिहास घडला. अखंड ९० आणि जादा डाव मिळून १२० मिनिटांत अवघे दोन गोल, त्यामुळे १-१ अशी बरोबरी; मात्र त्यानंतर पेनल्टी किकमध्ये गोलांचा धूमधडाका.

लंडन - युरोपा फुटबॉल लीगच्या अंतिम सामन्यात इतिहास घडला. अखंड ९० आणि जादा डाव मिळून १२० मिनिटांत अवघे दोन गोल, त्यामुळे १-१ अशी बरोबरी; मात्र त्यानंतर पेनल्टी किकमध्ये गोलांचा धूमधडाका. तब्बल २१ पेनल्टी किक झालेल्या या चकमकीत विलारेलने मँचेस्टर युनायडेचा ११-१० असा पराभव करून पहिल्यांदा विजेतेपद मिळवले. युरोपातील लीगमध्ये सर्वाधिक पेनल्टी होण्याचा हा विक्रमच झाला.

अखंड डावातील १-१ अशा बरोबरीमुळे सामन्याचा निकाल पेनल्टी किकवर गेला. एरवी पाच-पाच पेनल्टी किकमध्ये सामन्याचा निकाल लागतो, पण विलारेल आणि मँचेस्टर युनायटेड यांच्या सामन्यात मात्र वेगळेच घडत होते. दोन्ही संघांतील दहाही खेळाडूंनी आपापली पेनल्टी सत्कारणी लावली, त्यामुळे १०-१० असा गोलफलक झाला. शेवटी गोलरक्षकांवर गोल करण्याची वेळ आली. विलारेलचा गोलरक्षक जॉर्निमो रुलीने आपल्या संघाला निराश केले नाही. त्यांतर वेळ आली मॅंचेस्टरचा गोलरक्षक डी गे याची आणि त्याने नेमकी पेनल्टी चुकवली आणि पेनल्टीच्या या मॅरेथॉन सामन्यात विलारेलने इतिहास रचला.

दुर्दैवी मँचेस्टरसाठी हे वर्ष कपविना ठरले. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये दुसरे स्थान आणि या युरोपा लीगमध्येही दुसऱ्या स्थानावरच त्यांना समाधान मानावे लागले. क्लब फुटबॉलमध्ये नामवंत अशा मँचेस्टरला सलग चार वर्षे कोणताही करंडक जिंकता आलेला नाही. युरोपाच्या या अंतिम सामन्यातला पहिला गोल विलारेलच्या मॉर्नेनोने २९ व्या मिनिटाला; तर मँचेस्टरच्या कॅविनीने ५५ व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली होती. ही बरोबरी १०-१० पेनल्टीपर्यंत कायम राहिली होती.

दृष्टिक्षेपात

  • युरोपातील कोणत्याही लीगमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठल्यानंतर विजेतेपद मिळवणारा विलारेल पहिला संघ. याअगोदर २००८-०९ मध्ये यूएफा कपमध्ये शख्तर डोनेटक्सने अशी कामगिरी केली होती.
  • मँचेस्टर युनायडेटने गेल्या सातपैकी सहा पेनल्टी किकवरील सामने गमावले आहेत.
  • यंदाच्या मोसमातील सर्व स्पर्धा मिळून १०० गोल करणारा विलारेल युरोपातील १३ वा संघ

पेनल्टीचे विक्रम
1 सर्वाधिक पेनल्टी किकचा विक्रम हॅम्पशायर सिनियर कप (दुसरी फेरी) ब्रॉकेन्हर्स्ट आणि अँडोवर टाऊन संघात ९ ऑक्टोबर २०१३ रोजी झालेल्या या सामन्यात २९ पेनल्टी झाल्या त्यात ब्रॉकेन्हर्स्टने १५-१४ विजय
2  त्याअगोदर जॉन्स्टन पेंट ट्रॉफीत लेटॉन ओरियंट आणि डॅग्नेहॅम-रेडब्रिज सामन्यात २८ पेनल्टी. ७ सप्टेंबर २०११ रोजीच्या या सामन्यात डॅग्नेहॅमचा १४-१३ विजय

प्रथम श्रेणीच्या सामन्यात ४८ पेनल्टीचा विक्रम

  • प्रथम श्रेणी फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक ४८ पेनल्टीचा विक्रम झालेला आहे. २००५ मधील नामिबियन कपमध्ये केके पॅलेसने सिविसवर सामन्यात एकूण ४८ पेनल्टी झाल्या होत्या, त्यात केके पॅलेसचा विजय झाला होता.
  • अर्जेंटिना चॅम्पियन्सशिपध्ये अर्जेनिओस ज्युनियर संघाने रेसिंग क्लबवर ४४ पेनल्टीनंतर मात केली होती.

​ ​

संबंधित बातम्या