20 कोटी डॉलरनी साकारला विजयपथ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 March 2021

चॅम्पियन्स लीग; ॲटलेटिको माद्रिदचा बचाव भेदत चेल्सी सात वर्षांनी उपांत्यपूर्व फेरीत
 

लंडन : चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी उंचावण्यासाठी चेल्सीने काई हॅवरेत्झ, टिमो वेर्नर, हकीम झायेच यांच्यासाठी एकत्रित 20 कोटी डॉलर मोजले होते. त्यांनी चेल्सीला ॲटलेटिको माद्रिदविरुद्ध दुसऱ्या टप्प्यात 2-0 आणि एकत्रित 3-0 विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. त्यामुळे चेल्सीने सात वर्षांनंतर स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.  हॅवरेत्झ, वेर्नर यांनी रचलेल्या चालीवर झायेचने ॲटलेटिकोचा भक्कम बचाव भेदत चेल्सीचे दुसऱ्या टप्प्याच्या लढतीतील खाते उघडले. झायेकने दोन वर्षांपूर्वी ॲजाक्‍सच्या चॅम्पियन्स लीगमधील वाटचालीत मोलाची कामगिरी बजावली होती, त्यामुळे त्याला चेल्सीने खरेदी केले होते. झायेक या मोसमात फारसा यशस्वी नव्हता, पण त्याला चॅम्पियन्स लीग लढतीत केवळ या स्पर्धेतील बाद फेरीचा अनुभव असल्यामुळे खेळवण्यात आले. त्याने प्रभावी गोल केला. मोरोक्कोच्या झायेकने ऑक्‍टोबरनंतरचा पहिला गोल केला. 

या गोलमुळे बचावात ताकदवान असलेल्या ॲटलेटिकोस विजयासाठी दोन गोल करण्याचे आव्हान आले. प्रतिआक्रमणानंतरही हे ॲटलेटिकोस शक्‍य झाले नाही. एमर्सन पामिएरी याने भरपाई वेळेत गोल करीत चेल्सीचा विजय निश्‍चित केला. बचावपटू असलेल्या पामिएरी याचा तीन वर्षांतील केवळ दुसरा गोल. दरम्यान, फ्रॅंक लॅम्पार्ड यांच्याऐवजी लेल्या टशेल  मार्गदर्शनाखाली चेल्सी सलग 13 सामन्यांत अपराजित आहेत.

बायर्नचा सफाईदार विजय
 

बर्लिन : बायर्न म्युनिचने लौकिकास साजेशी कामगिरी करीत लाझिओला परतीच्या लढतीत 2-1 असे पराजित केले आणि एकत्रित निकालात 6-2 असे वर्चस्व राखले. रॉबर्टो लेवांडोवस्कीने बायर्नचे दुसऱ्या टप्प्याच्या लढतीत खाते ऊघडले. त्याच्याऐवजी उत्तरार्धात आलेल्या एरिक मॅक्‍झीम याने आघाडी वाढवली. या विजयामुळे बायर्न आता 18 व्या उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळणार आहे. त्यांनी या स्पर्धेत बार्सिलोनास मागे टाकले. या लढतीच्यावेळी बर्फ पडत होता, पण बायर्नच्या खेळावर त्याचा परिणाम झाला नाही. त्यांनी स्पर्धेतील सलग 19 वी लढत जिंकली. बायर्नचा खेळ क्वचितच खालावला, पण त्यांनी एका गोल व्यतिरिक्त प्रतिस्पर्ध्यांना काहीही साध्य करू दिले नाही. 
 


​ ​

संबंधित बातम्या