कोरोनाबाधित सुनील छेत्री भारताच्या लढतींना मुकणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 March 2021

भारतीय फुटबॉल संघ पंधरा महिन्यांचा आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दुष्काळ संपवताना ओमानविरुद्ध 25 मार्चला दुबईत खेळणार आहे.

नवी दिल्ली - देशातील आघाडीचा फुटबॉल आक्रमक सुनील छेत्री याला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे तो भारतीय फुटबॉल संघाच्या अमिरातीमधील लढतीत खेळू शकणार नाही. भारतीय फुटबॉल संघ पंधरा महिन्यांचा आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दुष्काळ संपवताना ओमानविरुद्ध 25 मार्चला दुबईत खेळणार आहे. कोरोनाची लागण झाली असली तरी कोणताही त्रास जाणवत नसल्याचे छेत्रीने सांगितले. गेल्या महिन्यापर्यंत छेत्री इडियन सुपर लीगमध्ये खेळत होता. तो लीगमधील शेवटची लढत 25 फेब्रुवारीस खेळला होता. दुबईतील लढतींसाठी भारताच्या संभाव्य फुटबॉलपटूंचे शिबिर 15 मार्चपासून होणार आहे. 

सुनील छेत्रीने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. त्याने ट्विटमध्ये लिहिले होते की, 'एकवाईट बातमी आहे. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यातील चांगली बाब ही आहे की, मला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. यातून सावरुन लवकरच पुन्हा मैदानात उतरेन. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे, असा संदेशही त्याने दिला होता. 

सुनील छेत्री आयएसएलमध्ये बंगळुरू एफसीच्या संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. त्याच्या संघाने सातव्या हंगामातील स्पर्धेतील 5 सामने जिंकेल तर 7 सामने अनिर्णित राखले. 8 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. छेत्रीने यंदाच्या हंगामात 20 सामन्यात आठ गोल डागले.
 


​ ​

संबंधित बातम्या