I League 2020 21 : आय लिगचा हिरो बिद्यासागरसिंग

दीपक कुपन्नावर
Tuesday, 30 March 2021

कोलकत्याच्या नामवंत ईस्ट बंगाल अकादमीसाठी झालेली निवड त्याच्या कारकिर्दीला नवे वळण देणारी ठरली.

चौदावी इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) फुटबॉल स्पर्धा लक्षवेधी ठरली ती नवा विजेता गोकुलम केरला एफसी आणि स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविणारा 23 वर्षीय बिद्यासागरसिंगमुळे. मणिपूरच्या टिडिम रोड  अ‍ॅथलेटिक युनियन (ट्राऊ ) संघाने त्याच्या चौफेर खेळाच्या जोरावर सनसनाटी तिसऱ्या स्थानावर भरारी घेतली. आय-लिगच्या इतिहासात हंगामात सर्वाधिक गोल नोंदविणारे अव्वल भारतीय फुटबॉलपटू बायचूंग भुतिया, रामन विजयन आणि सुनिल छेत्री यांच्या पंक्तीत स्थान मिळवून बिद्यासागरसिंगने प्रतिभावंत स्ट्रायकर म्हणून ठसा उमटविला. त्याने सफाईदार 12 गोल नोंदवित तमाम भारतीय फुटबॉलविश्वाला छेत्रीचा वारसदार होण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. 

मणिपूर म्हणजे गुणवंत फुटबॉलपटूंची खाण. केवळ मणिपूरच नव्हे तर ईशान्येकडील मिझोराम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, सिक्किम या सेव्हन सिस्टर्स राज्यातील खेळाडूशिवाय आज कोणताही इंडियन फुटबॉल लिग (आयएसएल), आय लिग संघ पुर्ण होऊ शकत नाही अशी अवस्था आहे. फुटबॉल जणू ईशान्येच्या नसानसांत भिनला आहे. असे म्हणतात सेव्हन सिस्टर्स राज्यांत लहान मुले चालयाला शिकण्याआधी फुटबॉलला किक मारायला शिकतात. बिद्यासागरसिंगचे वडीलच माजी फुटबॉल खेळाडू असल्याने त्याला फुटबॉलची गोडी वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागले नाहीत. शालेय स्पर्धा गाजवतच त्याला नामवंत संघ खुणावू लागले.

कोलकत्याच्या नामवंत ईस्ट बंगाल अकादमीसाठी झालेली निवड त्याच्या कारकिर्दीला नवे वळण देणारी ठरली. अठरा वर्षाखालील युथ आय लिग (सन 2016-17) स्पर्धतून त्याने व्यावसायिक फुटबॉलमध्ये पर्दापण केले. या स्पर्धेत अर्धा डझन गोल मारुन गुणवत्तेची झलक दाखवली. या कामगिरीच्या जोरावर त्याची प्रतिष्ठेच्या संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी बंगालच्या संघात निवड झाली. या स्पर्धेतही त्याने चार गोलचा धडाका लावत उत्कृष्ठ खेळाडू मिळालेल्या संधीवर कसे तूटून पडतात हेच सिध्द केले. ही त्याची घौडदौड लक्षात घेऊन ईस्ट बंगालने प्रथम कोलकत्ता लिगला आणि त्यानंतर आय लिग प्रथम श्रेणी संघात बढती दिली. पंरतू, परदेशी खेळाडूंमुळे त्याला स्ट्रायकर म्हणून पुरेशी खेळण्याची संधी न मिळाल्याने त्याची गोलची तहान भागू शकली नाही.

यंदाचा हंगाम त्याच्यादृष्टीने संस्मरणीय ठरला. ट्राऊचे प्रशिक्षक नंदकुमारसिंग यांनी त्याच्या आक्रमकतेला संयमाची जोड देण्याचा केलेला प्रयत्न कमालीचा यशस्वी ठरला. आय लिगच्या एकाच हंगामात बलाढ्य रियल काश्मिर आणि मोहामेडन संघाविरूध्द हॅटट्रिकचा डबल धमाका विक्रमी ठरला. गोलक्षेत्रात प्रतिस्पर्धी विस्कळीत झाले कि दबा धरुन बसलेला बिद्यासागरसिंग गोलजाळीवर तूटून पडत गोल करतो हीच त्याची खासियत बनुन गेली आहे. या त्याच्या कामगिरीने आयएसएल संघही प्रभावित झाले आहेत. यामुळे पुढील हंगामात तो आय़एसएल संघात दिसल्यास नवल नसणार हे नक्की.

आयएसएल, आय लिग सर्वच संघात परदेशी प्रशिक्षक स्ट्रायकर म्हणून परदेशी खेळाडूंना प्राधान्य देतात. साहजिकच त्यामुळे भारतीय स्ट्रायकरच्या विकासाला ब्रेक लागला आहे. त्याचा परिणाम आंतराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीवर होतो आहे. त्यामुळे सुनिल क्षेत्रीनंतर कोण हा प्रश्न भारतीय फुटबॉलवर्तुळाला सतावतो आहे. अशावेळी बिद्यासागरसिंग हा आशेचा किरण ठरु शकेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.


​ ​

संबंधित बातम्या