भारताच्या माजी फुटबॉलपटूचे वयाच्या 44 व्या वर्षी निधन 

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 26 January 2021

हेमंत आणि प्रशांत हे भारताकडून खेळणाऱ्या भावांच्या जोड्यांपैकी प्रसिद्ध अशी जोडी होती. प्रशांत यांनी 1999 मध्ये थायलंडविरुद्ध पदार्पण केलं होतं.

कोलकाता : भारतीय फुटबॉल संघाचा माजी गोलकिपर प्रशांत डोरा यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 44 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते.  प्रशांत डोरा यांचा मोठा भाऊ आणि भारताचा माजी गोलकिपर हेमंत यांनी यांसदर्भातील माहिती दिली आहे. प्रशांत डोरा गेल्या काही काळापासून आजारी होते. डिसेंबरमध्ये त्यांना हेमोफॅगोसिटिक लिम्फोहिस्टोसायटोसिस आजाराचे निदान झाले होते. यामुळे प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. यामुळे संसर्गजन्य किंवा कर्करोगासारख्या आजाराला आमंत्रण मिळते. 

हेमंत डोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार,   प्रशांत यांच्या प्लेटलेट कमी झाल्या होत्या. डॉक्टरांना या आजाराचं लवकर निदान करता आलं नाही. त्याच्यावर टाटा मेडिकल इथं उपचार सुरु होते. सातत्यानं रक्त चढवण्यात येत होतं. मात्र प्रशांतला वाचवण्यात डॉक्टरांना अखेर अपयश आले. दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

पुजारानं केलाय असाही पराक्रम; टी20 मध्ये झळकावलं होतं शतक!

हेमंत आणि प्रशांत हे भारताकडून खेळणाऱ्या भावांच्या जोड्यांपैकी प्रसिद्ध अशी जोडी होती. प्रशांत यांनी 1999 मध्ये थायलंडविरुद्ध पदार्पण केलं होतं. त्यांनी सैफ कप आणि सैफ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलं होतं. तसंच 1997-98 आणि 1999 मध्ये संतोष ट्रॉफीमध्ये सर्वोत्कृष्ट गोलकिपर म्हणून पुरस्कार पटकावला होता. प्रशांत कोलकाता पोर्ट ट्रस्ट, मोहमेडन स्पोर्टिंग, मोहन बागान आणि इस्ट बंगालकडून खेळला होता.


​ ​

संबंधित बातम्या