सामन्यापूर्वी मोठी दुर्घटना; विमान क्रॅश होऊन 4 फुटबॉलपटूंसह क्लबच्या अध्यक्षांचा मृत्यू

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 25 January 2021

पाल्मास फुटबॉल क्लबने दिलेल्या माहितीनुसार,  रविवारी  24 तारखेला सकाळी 8.15 च्या सुमारास ही विमान दुर्घटना घडली.

ब्राझीलमधील चौथ्या-स्तरीय पाल्मास सॉकर क्लबचे अध्यक्ष  आणि संघातील चार खेळाडूंचा विमान अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झालाय.  एका छोट्या विमानाने ही मंडळी स्थानिक स्पर्धेसाठी  चालली होती.  क्लबने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  अध्यक्ष लुकास मीरा यांच्यासह  लुकास प्रॅक्सिडीज, गिलहेर्म नो, रानुले आणि मार्कस मोलिनेरी या सर्व खेळाडूंचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या अपघातात पायलटचाही मृत्यू झाला आहे. 

पाल्मास फुटबॉल क्लबने दिलेल्या माहितीनुसार,  रविवारी  24 तारखेला सकाळी 8.15 च्या सुमारास ही विमान दुर्घटना घडली. सोमवारी 25 जानेवारी रोजी पाल्मास विरुद्ध विला नोवा यांच्या ग्रीन कपमधील सामना नियोजित होता. या सामन्यासाठी क्लबच्या अध्यक्षांसह चार खेळाडू गोइनियाला चालले होते, असे क्लबने आपल्या निवदेनात म्हटले आहे. विमान टोकॅन्टिन्स असोसिएशन ऑफ एव्हिएशनच्या धावपट्टीवर उतरताना क्रॅश झाले. यातील सर्वांचा मृत्यू झाला, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  

यापूर्वी 2016 मध्ये  ब्राझीलच्या फर्स्ट डिव्हिजन फुटबॉल टीमसह 81 जणांना मेडलिन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड विमान एका डोंगराला धडकले होते. यात  76 जणांनी आपले प्राण गमावले होते. यात ब्राझीलच्या काही खेळाडूंचा समावेश होता.  दोनवर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केलेल्या फर्नांडो यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. 
 


​ ​

संबंधित बातम्या