मुंबई सिटी विक्रमाच्या उंबरठ्यावर; नॉर्थईस्ट युनायटेडचा वचपा काढणार?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 29 January 2021

एफसी गोवा संघाने आयएसएल स्पर्धेच्या दुसऱ्या मोसमात 2015 साली सलग 12 सामने अपराजित राहण्याचा पराक्रम केला होता. त्याच्याशी आता मुंबई सिटीने बरोबरी साधली आहे. शनिवारी विजय किंवा बरोबरी नोंदविल्यास आयएसएल स्पर्धेत सलग 13 सामने अपराजित राहणारा पहिला संघ हा मान मुंबई सिटीस मिळेल.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत नवा विक्रम नोंदवण्याची संधी मुंबई सिटी एफसीकडे आहे. शनिवारी त्यांचा नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध सामना रंगणार आहे. या सामन्यात जिंकून अथवा बरोबरी साधत  सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या नावे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील नव्या विक्रमाची नोंद होईल. आतापर्यंतच्या स्पर्धेत मुंबई सिटी एफसीने सलग 12 सामन्यात अपराजित राहण्याचा पराक्रम केलाय. 

एफसी गोवा संघाने आयएसएल स्पर्धेच्या दुसऱ्या मोसमात 2015 साली सलग 12 सामने अपराजित राहण्याचा पराक्रम केला होता. त्याच्याशी आता मुंबई सिटीने बरोबरी साधली आहे. शनिवारी विजय किंवा बरोबरी नोंदविल्यास आयएसएल स्पर्धेत सलग 13 सामने अपराजित राहणारा पहिला संघ हा मान मुंबई सिटीस मिळेल. त्यांची नॉर्थईस्टविरुद्धची लढत बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर होईल. यंदा मुंबई सिटीने सलग लढतीत नऊ विजय व तीन बरोबरीची नोंद केली आहे. त्यांचे सर्वाधिक 30 गुण आहेत.

INDvENG: धोनीला मागे टाकून सर्वोत्तम कर्णधार होण्याची 'विराट' संधी

मुंबई सिटी बदला घेणार?

मुंबई सिटीला यंदाच्या मोहिमेतील पहिल्याच लढतीत नॉर्धईस्ट युनायटेडने धक्कादायक पराभव पत्करण्यास भाग पाडले, मात्र त्यानंतर लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने स्पर्धेत फार मोठी मजल मारत अग्रस्थान भक्कम केले आहे. सध्याचा फॉर्म पाहता, परतीच्या लढतीत मुंबईच्या संघास पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल. गुवाहाटीचा नॉर्थईस्ट संघ गुणतक्त्यात पहिल्या चार संघांत स्थान मिळवून प्ले-ऑफ फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. सध्या ते 18 गुणांसह पाचव्या क्रमांकावर असून चौथ्या क्रमांकावरील हैदराबादपेक्षा त्यांचा एक गुण कमी आहे. अंतरिम मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील मागील दोन्ही लढती जिंकताना अनुक्रमे जमशेदपूर व एटीके मोहन बागान संघाला हरविले आहे, तो धडाका कायम राखत मुंबई सिटी आणखी एकदा चकीत करण्यासाठी नॉर्थईस्टचे प्रयत्न असतील.

‘‘नॉर्थईस्टने मागील दोन सामन्यांत प्रगती साधली आहे. ते आक्रमक शैलीतील चांगले फुटबॉल खेळत आहेत आणि त्यांचे खेळाडू चेंडूवर नियंत्रण व वर्चस्व राखत आहेत. आम्हाला शंभर टक्के योगदान द्यावे लागेल,’’ असे सांगत मुंबई सिटीचे प्रशिक्षक लोबेरा यांना सावध पवित्रा घेतला. मुंबई सिटीने दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानवर सहा गुणांची आघाडी घेतली आहे. नॉर्थईस्टविरुद्ध पूर्ण तीन गुण प्राप्त केल्यास मुंबई सिटीस गाठणे इतर संघांना कठीण ठरेल. चेन्नईयीन एफसीविरुद्ध मध्यरक्षक अहमद जाहू याच्या चुकीमुळे पेनल्टी गोल स्वीकारावा लागल्यामुळे मुंबई सिटीस बरोबरीमुळे दोन गुणांचे नुकसान सहन करावे लागले होते. हैदराबादनेही त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखले होते.

धारदार आक्रमण, भक्कम बचाव

मुंबई सिटीने सातव्या आयएसएल स्पर्धेत धारदार आक्रमण रचताना 19 गोल नोंदविले आहे. त्यांचा बचाव स्पर्धेत भक्कम ठरला आहे. त्यांनी सर्वांत कमी पाच गोल स्वीकारले आहेत, तर गोलरक्षक अमरिंदर सिंग याने सर्वाधिक आठ क्लीन शीट्स राखल्या आहेत. नॉर्थईस्टने 17 गोल नोंदविले असून तेवढेच गोल स्वीकारले आहेत.
 


​ ​

संबंधित बातम्या