नेमारची हॅट्ट्रिक, ब्राझीलची विजयी सलामी 

संजय घारपुरे
Thursday, 15 October 2020

नेमारने हॅट्ट्रिक करीत सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत रोनाल्डोला मागे टाकले.

रिओ दे जेनेरिओ : नेमारने हॅट्ट्रिक करीत सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत रोनाल्डोला मागे टाकले. पण त्याला आपल्या या कामगिरीमुळे विश्वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलने कोपा अमेरिका विजेत्या पेरूचा 4-2 असा पराभव केला, हे जास्त सुखावत असेल. 

नेमारचे आता 64 आंतरराष्ट्रीय गोल झाले आहेत. त्याने सर्वाधिक वैयक्तिक गोलच्या ब्राझीलमधील क्रमवारीत रोनाल्डोला दोन गोलनी मागे टाकले; पण या क्रमवारीत अद्यापही पेलेच (77) आघाडीवर आहेत. नेमारचे तीनपैकी दोन गोल पेनल्टी किकवर आहेत. ही किक देण्याचा निर्णयच वादग्रस्त असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहे. अर्थात नेमारने भरपाई वेळेत गोल करीत टीकाकारांना काहीसे शांत केले. त्यामुळे दोन गोलच्या पिछाडीनंतरही ब्राझीलला विश्वकरंडक पात्रता मोहिमेस विजयी सुरुवात करता आली. 

''धोनीने उन्हात केस पांढरे केले नाहीत, त्यामुळेच तो वेगळा ठरतो....

पेरूने दोनदा घेतलेली आघाडी वादग्रस्त पेनल्टी किकमुळे राखता आली नाही. पहिल्यांदा गोलक्षेत्रात पेरू बचावपटूने प्रतिस्पर्ध्याचा शर्ट खेचल्याबद्दल, तर त्यानंतर नेमारला अवैधरीत्या रोखल्याबद्दल ही किक देण्यात आली होती. 

लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने बोलिव्हियाचे आव्हान 2-1 असे परतवले. बोलिव्हियाने आघाडी घेऊन अर्जेंटिनास हादरवले. पण त्यांच्या बचावपटूंनी चेंडू पास करताना चूक करीत अर्जेंटिनास बरोबरीची संधी दिली. त्यानंतर लिओनेल मेस्सीने रचलेल्या चालीवर निर्णायक गोल झाला. दरम्यान, इक्वेडोरने उरुग्वेचा 4-2 असा पाडाव केला आणि कोलंबिया - चिली लढत 2-2 बरोबरीत सुटली. 

जर्मनीची बरोबरी, स्पेनचा पराभव 
जोशीम लोव यांच्या जर्मनी मार्गदर्शकपदाची कारकीर्द संपण्याची शक्‍यता आहे. जर्मनीला नेशन्स लीग स्पर्धेत स्वित्झर्लंडला 3-3 असे रोखण्यावरच समाधान मानावे लागले. त्याच वेळी स्पेनला युक्रेनविरुद्ध हार पत्करावी लागली. जर्मनीस गेल्या पाचपैकी चार लढतीत बरोबरी स्वीकारावी लागली. त्यातील तीनमध्ये जर्मनीने आघाडी दवडली होती. या वेळी जर्मनीने 0-2, 2-3 पिछाडीनंतर हार टाळली. लोव यांनी या सामन्यात घडलेल्या चुका या संघ घडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असल्याचे सांगितले. बदली खेळाडू व्हिक्‍टर त्सिगॅनकोव याने युक्रेनला स्पेनविरुद्ध 1-0 असे विजयी केले. घरच्या मैदानावरील लढतीत स्पेनचे एकतर्फी वर्चस्व होते. पण त्यांना 2018 च्या नोव्हेंबरनंतरच्या पहिल्या पराभवास सामोरे जावे लागले.


​ ​

संबंधित बातम्या