ISL2021 : मुंबई सिटीचा विक्रम हुकला; ब्राऊनचे तीन मिनिटांत दोन गोल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 30 January 2021

जमैकाच्या देशॉर्न ब्राऊनच्या झंझावातामुळे पहिल्या नऊ मिनिटांच्या खेळात मुंबई सिटीस दोन जबरदस्त झटके बसले. या तीस वर्षीय आघाडीपटूने तीन मिनिटांत दोन गोल केल्यामुळे गुवाहाटीच्या संघाचे पारडे जड झाले.

पणजी : जमैकन स्ट्रायकर देशॉर्न ब्राऊन याच्या कामगिरीच्या जोरावर नॉर्थईस्ट युनायटेडने मुंबई सिटीस दोन वेळा पराभूत करण्याचा पराक्रम करुन दाखवला. सातव्या हंगामातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी झालेल्या सामन्यात नॉर्थईस्ट  युनायटेडने  2-1 अशा फरकाने विजय नोंदवला. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर रंगलेल्या सामना अनिर्णित करुन मुंबई एफसीला अनोखा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी होती. पण त्यांनी ती गमावली.   

जानेवारीतील ट्रान्स्फरमध्ये बंगळूर एफसीकडून नॉर्थईस्ट संघात आलेल्या ब्राऊनने अनुक्रमे सहाव्या आणि नवव्या मिनिटाला गोल डागले. मुंबई सिटीने 85 व्या मिनिटाला पहिला गोल डागला. बदली खेळाडू म्हणून आलेल्या इंग्लंडच्या एडम ली फाँड्रेने हा गोल नोंदवला. मात्र अखेरच्या काही मिनिटांत त्यांना बरोबरी साधण्यात अपयश आले.  स्पर्धेत आतापर्यंतच्या 12 लढतीमध्ये मुंबई सिटीचा संघ अपराजित होता. नॉर्थईस्ट युनायटेडला बरोबरीत रोखून किंवा सामना जिंकून सर्वाधिकवेळा अपराजित राहण्याचा विक्रम करण्याची त्यांच्याकडे संधी होती. यापूर्वी 21 नोव्हेंबर 2020 रोजी वास्को येथील टिळक मैदानावर सनसनाटी निकाल नोंदविताना नॉर्थईस्टने मुंबई सिटीस 1-0 फरकाने नमवले होते.  

BBL 10 : बॅटला बॉल लागला नाही अन् अंपायरने दिलं आउट! मार्शनं शिव्या घालत सोडलं मैदान

 ब्राऊनचे तीन मिनिटांत दोन गोल

जमैकाच्या देशॉर्न ब्राऊनच्या झंझावातामुळे पहिल्या नऊ मिनिटांच्या खेळात मुंबई सिटीस दोन जबरदस्त झटके बसले. या तीस वर्षीय आघाडीपटूने तीन मिनिटांत दोन गोल केल्यामुळे गुवाहाटीच्या संघाचे पारडे जड झाले. सहावे मिनिट सनसनाटी ठरले. नॉर्थईस्टच्या लुईस माशादो याने पेनल्टी क्षेत्राबाहेरून मारलेला सनसनाटी फटका मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने अडविला, पण चेंडू व्ही. सुहैर याच्याकडे गेला. त्याने चेंडू निम दोरजी याच्याकडे पास केला.

नॉर्थईस्टच्या बचावपटूने ब्राऊनला क्रॉसपास दिला असता सणसणीत फटक्यावर पहिल्या गोलची नोंद झाली. तीन मिनिटानंतर मुंबई सिटीचा बचाव सेटपिसेसवर हादरला. फेडेरिको गालेगोच्या कॉर्नर फटक्यावर मुंबई सिटीचा हर्नान सांताना व्यवस्थित हेडिंग साधत चेंडू दिशाहीन करू शकला नाही. त्याचा लाभ उठवत लुईस सांतानाने ब्राऊनकडे चेंडू टाकला असता जमैकन खेळाडूने गोल करण्यात चूक केली नाही.


​ ​

संबंधित बातम्या